दादाजी वैशंपायन यांच्या वास्तव्याने शेवगांवची भूमी पावन झाली : आ.मोनिका राजळे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगांव :- प.पू.योगतज्ञ संत दादाजी वैशंपायन यांच्या वास्तव्याने शेवगांवची भूमी पावन झाली आहे. या भूमीवरील विविध विकासकामांना सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही आ.मोनिकाताई राजळे यांनी दिली.
येथील गुरूदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला व क्रीडा संस्थेच्यावतीने प.पू.योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष श्री.अर्जुनतात्या फडके यांनी स्वागत व प्रास्तविक करताना प.पू दादाजी वैशंपायन यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या स्थानाची आणि परिश्रमपूर्वक सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली.
आ.मोनिकाताई राजळे, प.पू.गजानन कस्तुरे (नाशिक) आणि मुंबई येथील एमएसडीएल वित्त विभागाचे संचालक अनुदिप दिघे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुणे येथील श्रीस्वामी समर्थ कृपांकित प.पू. श्री. नारायण भाटे काका आणि अहिल्यादेवीनगरमधील नाथ संप्रदायाचे संशोधक तथा प्रवचनकार मिलिंद चवंडके यांना आध्यात्मिक पुरस्काराने तर लातूर येथील निश्चल पुरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डाॅ.धर्मवीर भारती यांना सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र, आकर्षक स्मृतीचिन्ह, नामजपाची शाल, मोठा पुष्पहार आणि दहा हजार रूपये रोख असे होते.
आ.राजळे पुढे म्हणाल्या, दादाजी वैशंपायन यांच्या प्रेरणेने येथे उभारण्यात आलेले भगवान श्री दत्तात्रेयांचे देवस्थान शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेत समाविष्ट करून दत्तभक्तांसह साधकांना अधिकाधिक उत्तम सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.
प.पू.गजानन कस्तुरे म्हणाले, दादाजी वैशंपायन यांच्या वास्तव्याने येथील भूमी पवित्र झाली आहे. दादाजींनी आपले जीवन समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या उध्दारासाठी समर्पित केले. त्यांचा आदर्श समोर ठेवून श्रीगुरूदत्त सामाजिक संस्था कार्यरत आहे. विविध क्षेत्रात निरपेक्षपणे कार्यरत असलेल्या व्रतस्थांचा शोध घेऊन पुरस्काररूपी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर देत आहे. दादाजींचा कृपाप्रसाद या सद् भावनेने पुरस्कार स्विकारतांना पुरस्कारार्थी भारावून जाताना पहाणे उपस्थित सर्वांनाच स्फूर्ती ठरते आहे.
पुरस्कार स्विकारल्यावर मनोगत व्यक्त करताना प.पू.नारायण भाटे काकांनी स्वामी सेवा करताना अनेक भक्तांना मार्गदर्शनही करत आलो, असे सांगितले. मिलिंद चवंडके यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक परिवारातील माझ्या कार्याचा श्रीगणेशा शेवगांवमध्ये झाला. गेली ४० वर्षे विविध दायित्व सांभाळली. जीवनातील ३२ वर्षे अध्यात्मिक पत्रकारितेत समर्पण करताना अनेक साधू-संत-महंतांचे सत्संग लाभले. नर्मदा मैय्याने अवघ्या ९३ दिवसात पायी परिक्रमा करवून घेतली. नवनाथ पावलोपावली सोबत राहून नाथकार्य करवून घेत असल्याचे अनुभवतो आहे, असे सांगितले. डाॅ.धर्मवीर भारती यांनी गेल्या १३ वर्षापासून प्रतिवर्षी १५६ विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेत असल्याची माहिती दिली.
नर्मदा परिक्रमा पायी केलेले पी.बी.शिंदे यांना सन्मानित करण्यात आले. सोहळ्यास संस्थेचे सचिव फुलचंद रोकडे, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड,सा.बां.चे उपविभागीय अभियंता प्रल्हाद पाठक, भिंगार शिवसेनेचे शहर प्रमुख सुनिल लालबोंद्रे, भिंगार छावणी परिषदेचे नगरसेवक रविंद्र लालबोंद्रे तसेच शरद वैशंपायन, अतुल पवार (पनवेल), उदय देशपांडे (नाशिक) रविंद्र पुसाळकर, प्रशांत दिघे, नंदकुमार शेळके, संजय खैरे, अॅड.विजय काकडे, महेश फलके, सुनिल रासने, बाळासाहेब मुरदारे, मनिष बाहेती, ओमप्रकाश बाहेती, बाबुशेठ जोशी, सुरेश घुले, संजय कुलकर्णी, प्रदिप हरके, लक्ष्मण काळे, निलेश रोकडे, अर्पणा भट्ट प्रभुती उपस्थित होते. दिलीप फलके यांनी सूत्रसंचलन केले. काकासाहेब लांडे यांनी आभार मानले. सामुदायिक महाआरती आणि महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.