संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- सरपंचपदाच्या खुर्चीसाठी आक्रमक होत दरेवाडीतील राजकीय पदाधिकाऱ्यांमध्ये सोमवारी (दि.१३) चांगलीच हाणामा-या झाल्याची घटना घडली. यावेळी समोरील विरोधीगट आक्रमक होत प्रत्त्युत्तर दिल्याने दोन्ही गटामध्ये तुंबळ हाणामाऱ्या झाल्या. या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात परस्परविरोधी विनयभंग व मारहाणीच्या फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
पोलिसांनी दोन्ही गटाच्या २० जणांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या हाणामारीत दोन्ही गटाचे एकूण ७ जण जखमी झाले असून १२ अटक करण्यात आली आहेत.
पहिली फिर्याद दिलेल्या महिलेने म्हटले आहे की, दरेवाडीतील वाकोडी फाट्यावर असलेल्या दुकानात ८ जणांचा जमाव आला. त्यांनी ग्रामपंचायतपदाच्या अधिकारावरून भांडणं करण्यास सुरूवात केली. यानंतर विनयभंग करून केबल व लोखंडी साखळीने मारहाण केली. दुकानामधील रोकड व महिलेच्या गळ्यातील ३ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण ओरबाडले. यात महिलेसह एक जखमी झाला. भिंगार पोलिसांनी याप्रकरणी ८ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हेकॉ झरेकर करीत आहेत.
दुसरी फिर्याद एका विद्यार्थिनीने दिली आहे. एक युवक सतत पाठलाग करुन छेडछाड करत होता. त्याला काही राजकीय पदाधिकारी प्रोत्साहन देत होते. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलो असता आरोपींनी बेकायदेशीर जमाव गोळा करुन शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी व लोखंडी रॉडने मारहाण केली. गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून नेले. याबाबत फिर्याद देण्यासाठी गेल्यानंतर पोलिस स्टेशनमध्येही शिवीगाळ करीत मारहाण केली. यात ५ जण जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी १२ जणांविरूद्ध गुन्हा नोंदवला आहे. तपास पोना गायकवाड हे करीत आहेत.
👉शिवसेना व भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समावेश
दरम्यान, परस्परविरोधी फिर्यादी देण्यासाठी आलेल्या दोन्ही गटामध्ये पोलिस ठाण्यातच भांडणं झाले. शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच या भांडणात सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याचेही म्हटले आहे. या परस्परविरोधी गुन्ह्यात शिवसेना व भाजपच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले आहे.