👉पंडीत दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा उत्साहात संपन्नसंग्राम सत्तेचा वृत्तसेवा
:– आजच्या आधुनिकतेच्या युगात तरुणांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात कौशल्यावर आधारित शिक्षण घेऊन स्वतः चा व पर्यायाने देशाच्या विकासात हातभार लावावा, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
Online Natwork
अहमदनगर
कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि पेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडीत दिनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचा शुभारंभ खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी श्रम व रोजगार मंत्रालयाचे डॉ अनिल जाधव,हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष अनंत फडनिस,सुमतीलाल कोठारी, डॉ माहेश्वरी गावीत,कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कौशल्य विकास व शिक्षण या विषयावर मोठ्या प्रमाणावर निधी राखीव ठेवण्यात आला आहे. तरुणांना रोजगारक्षम बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी तरुणांच्या पाठीशी केंद्र शासन भक्कमपणे उभे असून तरुणांच्या योजनांकरिता निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
श्रम व रोजगार मंत्रालयाचे डॉ. अनिल जाधव यांनी मुलाखतीचे तंत्र करिअर मार्गदर्शन, कौशल्याचे महत्व विशद केले.
हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अनंत फडनिस यांनी संस्थेच्या शतकोत्तर वर्ष सुरु असून युवकांकरिता विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन संस्थेची विकासात्मक वाटचाल सूरु असल्याचे सांगत रोजगारक्षम शिक्षणाची आवश्यकता असून तरूणांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून स्वत:चा तसेच पर्यायाने देशाचा विकास केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सुमतीलाल कोठारी व डॉ. माहेश्वरी गावीत यांनीही मनोगत व्यक्त करत विभागीय रोजगार मेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात निशांत सूर्यवंशी म्हणाले की, श्रम व श्रमाला प्रतिष्ठा मिळणे आवश्यक असून युवकांनी रोजगार स्वयंरोजगाराच्या माध्यमातुन स्वत:च्या जीवनाला योग्य दिशा दिली पाहिजे. विभागीय रोजगार मेळाव्यामध्ये एकुण 32 आस्थापनांनी 1 हजार 522 रिक्तपदे अधिसूचित केली होती. तसेच जिल्हयामध्ये कार्यरत एकुण 8 महामंडळाचे अधिकारी, प्रतिनीधी मार्गदर्शन करण्यास उपस्थित होते. विभागीय रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांकरिता नोकरीसाठी मुलाखती, स्वयंरोजगार मार्गदर्शन व विविध महामंडळाच्या कर्ज योजनांची माहिती, रोजगारक्षम कौशल्य प्रशिक्षणाची संधी इ. बाबी एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्यात आलेल्या होत्या. या विभागीय रोजगार मेळाव्यास एकूण 1 हजार 274 नोकरी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. यामध्ये 612 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. पैकी 225 उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली. तसेच 172 उमेदवारांनी रोजगार स्वयंरोजगार करण्यास्तव इच्छुकता दर्शविली असून कौशल्य प्रशिक्षणामध्ये 148 उमेदवारानी इच्छुकता दर्शविली.