संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी लालबागच्या ‘सुखकर्ता’ इमारतीमध्ये वितरित केलेल्या गाळ्यांच्या स्थगितीचे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान जवळपास दोन तास आव्हाड ‘नॉट रिचेबल’ होते. त्यांच्या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्णतः अनभिज्ञ होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत एकांतात भेट झाल्यानंतर आणि त्याआधीपासूनच राज्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू झाला आहे. यातल्या बर्याच भेटीगाठी या माध्यमांच्या कॅमेरा समोरून जाऊन मग एकांतात झालेल्या आहेत. या भेटीगाठींचा परिपाक म्हणजे राज्यात सत्ताबदल होईल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, सोमवारी झालेल्या या दोन नेत्यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी दुपारी शिवडी मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी लालबाग परिसरात कॅन्सरग्रस्तांना वितरित करण्यात आलेल्या १०० गाळ्यांच्या विरोधात उसळलेल्या जनक्षोभाची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आमदार चौधरींच्या त्याच पत्रावर शेरा मारत गाळे वितरणाला स्थगितीचे आदेश आपल्या प्रधान सचिवांना लगोलग देऊन टाकले आहेत.