छ.संभाजीनगर जिल्ह्यातील चोरीची
स्कॉर्पिओ पाथर्डी पोलिसांनी पकडली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online News Natwork
पाथर्डी : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापुर (शिवाजीनगर), या ठिकाणीहून चोरी गेलेली महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी पाथर्डी पोलिसांनी नाकाबंदी करून आरोपीसह ताब्यात घेतली आहे. संतोष ओंकार गायकवाड (वय २६, रा. तलवाडा ता. गेवराई जि.बीड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस ठाण्याचे सपोनि हरिश भोये, पोकाॅ अरुण निळे, पोकॉ निलेश गुंड, पोकाॅ संजय जाधव, पोकॉ अल्ताफ शेख आदींच्या टिमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२६ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास उमेश झुंबरलाल नहार (वय ४३, रा.शिवाजीनगर, गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर) यांच्या मालकीची ५ लाख ५० हजार रु. किंमतीची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी ( एमएच-२०, ईई १८२८) ही अज्ञात चोरट्याने लबाडीचे इराद्याने चोरुन नेली, याबाबत गंगापुर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५८६/२०२४ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात चोरीस गेलेली स्कॉर्पिओ गाडी ही दि.२८ डिसेंबर २०२४ रोजी खरवंडी- पाथर्डी रस्त्याने पाथर्डी शहराकडे येत आहे, ही माहिती नियंत्रण कक्ष (अहिल्यानगर) यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनचे डायल ११२ डयुटीसाठी असलेले पोकॉ अरुण निळे यांना कळविल्याने त्यांनी हा प्रकार सपोनि हरिश भोये यांना कळविल्याने सपोनि. हरीश भोये यांनी पोलिस टीम घेऊन पाथर्डी खरवंडी रोडवर पाथर्डी शहरातील पोळा मारुती मंदीराजवळ नाकाबंदी लावली. या दरम्यान स्कॉर्पिओ गाडी थांबवून आरोपी संतोष ओंकार गायकवाड ( रा. तलवाडा ता. गेवराई जि.बीड) यांस स्कॉर्पिओ गाडीसह ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात आणले. याबाबत गंगापुर पोलीस ठाणे( जि. छ. संभाजीनगर) पोलीस निरीक्षक यांना कारवाई झाल्याची माहिती दिली. तद्नंतर स्कॉर्पिओ गाडी ही आरोपीसह गंगापुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली आहे.