नारायणडोह शिवारातील घटना, दोघे अटक ; नगर तालुका पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः नगर तालुक्यातील नारायणडोह शिवारात चोरी करण्याच्या उद्देशाने ट्रक चालकास धारदार शस्त्राने जिवे ठार मारणार्यास अर्धा तासात पाठलाग करुन पकडण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे. ओसवाल इंपिरीअल चव्हाण, साहेबा आनंदा गायकवाड (दोघे रा. वाळूज ता.जि. अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या आदेशानुसार नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोिलिस ठाण्याचे सपोनि प्रल्हाद गिते यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोउपनि पतंगे, सफौ रमेश गांगर्डे, पोहेकॉ झावरे, पोकॉ बांगर, पोकॉ अन्सार शेख, पोकॉ राजू खेडकर आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.11 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11.05 वाजता माहिती मिळाली की, ओसवाल इंपिरीअल चव्हाण व साहेबा आनंदा गायकवाड दोघे (रा. वाळूज ता.जि.अहिल्यानगर) यांनी एक वाळूज बायपास रोडवरुन कंटेनर घेऊन कुरणवस्ती, नारायणडोह शिवार या ठिकाणी लाईटचे केबल पोल व इलेक्ट्रीक पोलला धडक देऊन नुकसान केले आहे. एक अनोळखी व्यक्ती जखमी अवस्थेत रोडच्या बाजूला पडलेला आहे, अशी माहिती मिळाल्याने सपोनि गिते व पोलीस स्टाफ सह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्या ठिकाणी गेल्यानंतर नवनाथ मुरलीधर जायभाय यांच्याकडून समजले की, सकाळी 10.30 ते 11.30 वा.च्या दरम्यान ओसवाल इंपिरीअल चव्हाण व साहेबा आनंदा गायकवाड या दोघांंनी कंटेनरच्या चालकास चाकूने मारले असून ते त्यांनी कंटेनर इलेक्ट्रीक पोलला धडक देवून त्यांचा पाठलाग करत असताना नारायणडोह रेल्वे ब्रीज खाली त्यांना अडवले असता त्यांनी कंटेनर ब्रीजखाली सोडून देऊन मला चाकूचा धाक दाखवून कुरणवस्तीकडे जाणार्या रेल्वे पटरीने पळाले आहेत, अशी माहिती दिली.
यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपतराव भोसले, अहिल्यानगर क्राईम बॅ्रँचचे पोनि दिनेश आहिरे यांना माहिती दिली.आरोपीच्या शोध घेतला असता आरोपी हे रेल्वे पटरीने पळत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस स्टाफ तात्काळ रेल्वे पटरीकडे जाऊन दोन ते अडीच किलोमीटर आरोपींचा पाठला करुन आरोपींना पकडले. त्यांच्या कपडयांवर रक्ताचे डाग दिसून आले. कंटेनरची चावी खिशात मिळून आली. कंटेनर कोठे आहे असे विचारले असता त्यांनी कंटेनर हा ब्रीजच्या खाली उभा केला असल्याचे सांगून, त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. गेला माल 28 लाख रुपये किंमतीचा हरभरा व 40 लाख रु. किं.चा कंटेनर हस्तगत करुन आरोपीविरुध्द भा.न्या. संहिता कलम 103(1),309(6),111,324(4)(5),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि प्रल्हाद गिते हे करत आहेत.