संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत :-कुकडी प्रश्नावरून आरोप प्रत्यारोप व टीका टिप्पणीचे सत्र सुरूच असून श्रीगोंदयातील घनश्याम शेलार यांनी माजीमंत्री प्रा राम शिंदे यांचेवर टीका केल्यानंतर कर्जत तालुक्यातील कुंभेफळ धांडेवाडीचे सरपंच काकासाहेब धांडे यांनी अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या शर्थीच्या प्रयत्नातूनच डिंभे ते माणिकडोह या १६ किमी च्या बोगद्याला कृष्णा खोरे विकास महामंडळाने १३ फेब्रुवारी २०१९ रोजी मान्यता दिली. त्यामुळे सत्तेच्या तुकड्या कडे पाहून आपले पाय फिरवणाऱ्यांनी प्रा.राम शिंदे यांना प्रती प्रश्न विचारु नये अशी खोचक टीका कर्जत तालुका भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व कुंभेफळ ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच काकासाहेब धांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते घनश्याम आण्णा शेलार यांच्या वर केली आहे.
प्रा राम शिंदे हे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे उजवे हात होते असे म्हणाऱ्यांनो लक्षात ठेवा हे खरचं होते म्हणूनच ३१ जानेवारी २०२० रोजी या बोगद्यासाठी सीडीओने या प्रकल्प संकल्पनेस मान्यता दिली आणि ३०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया ही झाली मात्र सरकार मध्ये बदल झाला हा सर्व प्रशासकीय भाग आहे. प्रा. राम शिंदे यांनी या योजनेच्या मान्यतेसह निधी व निविदा प्रक्रिया पूर्ण केलेली आहे .मात्र पुणेकरांच्या विरोधात तालुक्याचे हीत जोपासण्याचं औदार्य नसलेल्यांचे हा बोगदा पूर्ण करा म्हणण्याचं धाडस देखील नाही, व योग्यताही नसल्याचे पुणेकर ही ओळखतात हे आपण बहुधा जाणतात म्हणूनच शिंदेसाहेबांनी नी मंजूर केलेल्या बोगद्याचा विषय सोशल मीडियातुन मांडत आहात.
सत्तेच्या ओझ्याखाली आपला स्वाभिमान गहाण ठेवणारे स्व:ताच्या शेतातील ऊस पाण्याअभावी जळताना पाहतात मात्र आपल्या पुणेकर मालका समोर पाण्याबाबत ब्र शब्द ही काढत नाहीत अशा नेत्यांनी कुकडी प्रकल्प योगदानाबद्दल प्रा राम शिंदे यांच्यावर बोलणे योग्य नाही.
कुकडी प्रकल्पासाठी प्रा राम शिंदे यांच्या आग्रहाखातर १८ सप्टेंबर २०१८ या दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाने ३ हजार ९७७.८५ कोटी रुपये मंजूर केले. जवळपास चाळीसहून अधिक वर्षे हा प्रकल्प केवळ पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांच्या दुजाभावामुळे रेंगाळत होता. हा प्रकल्प रखडल्याने शेतकऱ्यांच्या पाचवीला दुष्काळ पुजलेला होता. दुष्काळग्रस्त म्हणून त्यांच्या कपाळावर नामुष्कीचा शिक्का बसला होता. प्रा राम शिंदे यांनी प्रकल्पाला निधी मंजूर केल्याने या सात तालुक्यांतील दुष्काळग्रस्तांच्या १,४४,९१२ हेक्टर जमिनीला ७१८.५० किलोमीटर लांबीच्या कालव्याने पाणी मिळणे शक्य झाले आहे. येवढ्या मोठ्या नेतृत्वा बदल काही बोलण्या अगोदर पुणेकरांसमोर शेपूट हलवणारांनी आपली पात्रता तपासून घ्यावी असे मत काकासाहेब धांडे यांनी व्यक्त केले.
पालकमंत्री पदी असताना आवर्तन काळात श्रीगोंद्यावर प्रा. राम शिंदे यांनी पोलीसांची दहशत (ठेवली) केली असे घनश्याम शेलार यांनी वक्तव्य केले, शिंदे यांची कुकडीचे पाणी आणताना मोठी दहशत होतीच पण ती श्रीगोंद्यावर नाही तर पुणेकरांवर होती, प्रा राम शिंदे या नावाने कुकडीच्या पाण्याच्या विषयात पुणेकरांची झोप उडवली होती म्हणुनच श्रीगोंदा-कर्जतकरांना पुर्ण क्षमतेने व दाबाने पाणी मिळत होते. त्यांनी कधी ही श्रीगोंदा-कर्जत हा वाद केला नाही. मात्र आपण श्रीगोंदा-कर्जत असा भेद करत कुकडीचे पाणी श्रीगोंदा तालुका हद्दीत फोडून घेता, खालच्या लोकांचा विचार न करता आपली पोळी कशी भाजते याचाच विचार करता म्हणून कर्जत तालुक्यातील जनतेला पुर्ण दाबाने पाणी मिळत नाही. आपण कर्जत तालुक्याच्या कुकडी पाणीवाटप समितीच्या अशासकीय सदस्य पदी आहात याचा विसर कदाचित आपल्याला पडलेला आहे आणि कुंपणच शेत खात असेल तर आमच्या तालुक्याला आपण काय न्याय देणार, म्हणून तुमची कुकडी सल्लागार पदी कर्जतचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक होणे कीती अयोग्य आहे हेच तुम्ही उदाहरण सह स्पष्ट दाखवून दिले आहे असेही धांडे यांनी म्हंटले आहे, शेलार यांनी कसला ही अधिकार नसताना फक्त नामधारी म्हणून आणि मालकाच्या कौतुकाच्या थापेसाठी बडबडत राहाणे योग्य नाही. माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या काळात नेहमीच आवश्यक त्या वेळी कुकडी आवर्तनातुन मुबलक पाणी जनतेला मिळत होते, त्यामुळे कोणालाही टोकाची आंदोलने करण्याची आवश्यकताच भासली नाही याची आठवण या टीकाकार नेत्यांनी ठेवणे गरजेचे आहे. आज आता जनता कुकडीच्या पाण्यासाठी प्रा राम शिंदे यांच्या समोर धायमोकलुन रडते आहे याचे भान ठेवावे. विकासाने झपाटलेले नेतृत्व होते म्हणून मतदारसंघात राज्याच्या तिजोरीतून करोडो रुपयांचा निधी येत होता. सत्तेची उब मतदारसंघाच्या भल्यासाठी त्यांनी वापरली, वरिष्ठांच्या मर्जी साठी लाळघोटी, कींवा बोटचेपी भुमिका घेणारांना प्रा. राम शिंदे यांचा भुतकाळ आज वर्तमान काळात ही धडकी भरवतो आहे हेच यातुन सिद्ध होते असे मत भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते काकासाहेब धांडे यांनी व्यक्त करताना शेलार यांनी कमीत कमी आपल्या तालुक्यातील शेतकऱ्याची मते कुकडीच्या पाण्याबाबत आजमावीत उगाच काहीही वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवत सक्रिय राहण्याचा अट्टाहास करू नये यामुळे पुणेकर नेते खुश होतील पण आपल्या तालुक्यातील जनता काय विचार करते हे पण पहा असा सल्ला दिला आहे.
संकलन : आशिष बोरा