संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पुणे :- राज्यातील सर्व गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून अशा नावांऐवजी महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत खोसे, समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त श्रीमती रंजना गगे, समाजकल्याण सहायक आयुक्त संगिता डावखर, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, मुख्याधिकारी, राजगुरुनगर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.
“सामाजिक न्याय दिनाचे ” औचित्य साधून सर्व ग्रामपंचायत पातळीवर जातीवाचक असलेली गावे, रस्ते व वस्त्यांच्या नावांची यादी करुन सदरची नावे बदलण्याबाबत गावक-यांना अवगत करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. ही कार्यवाही ग्रामसभा/ बैठक घेऊन त्वरीत करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीची प्रत व नावे बदलेल्या गावांची /वस्त्यांची/रस्त्यांची यादी समितीस सादर करावी. पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी नावे बदलण्याची कार्यवाही 15 दिवसांमध्ये करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीस सादर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.