👉भगवानगड आणि पंकजा मुंडे, धनंजय मुंडे यांच्यातील दुरावा मिटला!
👉भाजर्डी येथील नारळी सप्ताह सोहळ्यात मुंडे बहीण-भावंडांनी घेतले महंत नामदेवशास्त्रींचे आशीर्वाद!
👉गडाविषयी चुकीचे काही बोलले असेन तर मान कापून देईन – पंकजा मुंडे-पालवे
बाळासाहेब खेडकर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बोधेगाव – संत भगवानबाबा यांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहाच्या भाजर्डी येथील सोहळ्याला माजी मंत्री व भाजप नेत्या पंकजा मुंडे-पालवे, माजी मंत्री व आमदार धनंजय मुंडे या दोघा बहीण-भावंडांनी हजेरी लावत, भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री यांचे आशीर्वाद घेतले. दोघे बहीण भावंडांसह, न्यायाचार्य नामदेव शास्त्री यांच्यातील गेली सात वर्षे असलेले मनभेद यानिमित्ताने मिटल्याचे दिसून आले. दोघा भावंडांना अखेर गडानेच एकत्र आणल्याची प्रतिक्रिया यावेळी उमटली. राजकारणातील लढाई विचारांची आहे. पण, गडाच्या विकासासाठी आम्ही एकत्र यायचे ठरवले आहे, अशी ग्वाही आ. धनंजय मुंडे यांनी दिली. तर, मी भगवानगडाविषयी काही चुकीचे बोलले असेन तर मान कापून ठेवीन. पंकजा मुंडे जीवंत असेपर्यंत भगवानबाबांच्या गादीला धक्का लागणार नाही, अशी ग्वाही पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली. यावेळी या दोघाही भावंडांना महंत नामदेव शास्त्री यांनी आशीर्वाद देत, दोघेही मुंडे घराण्याचे आहात, दोघांचे आयुष्य चांगले आहे. मी राजकारणी नाही, साधुसंतांचा आदर ठेवा, मागे बोलू नका, असा सल्ला यावेळी दिला.
भाजपचे नेते व माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीत भगवानगडाचे महत्व अनन्य साधारण असे राहिले आहे. परंतु, त्यांच्या निधनानंतर पंकजा व धनंजय मुंडे या बहीण-भावात वितुष्ट आल्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी भगवानगडाचा राजकीय वापर रोखला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून भगवानगडाबाबत काही टीका-टिप्पणी झाली होती. या घटनेनंतर पंकजा मुंडे ह्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे भगवानभक्ती गडावर मेळावा घेतात. तर धनंजय मुंडे हे माहूरगड येथे दर्शनाला जातात. मात्र आज सात वर्षानंतर नामदेव शास्त्री, धनंजय मुंडे, आणि पंकजा मुंडे-पालवे यांच्यात भगवानबाबा भक्तांच्या मुद्द्यावरून दिलजमाई झाल्याचे सकारात्मक चित्र दिसून आले. याप्रसंगी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यादेखील उपस्थित होत्या.