खूनाचा प्रयत्न करणा-या ७ जणांना बेड्या ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Network
अहिल्यानगर : खूनाचा प्रयत्न करणाऱ्या ७ जणांना बेड्या ठोकण्याची कारवाई भिंगार कॅम्प पोलीसांनी केली आहे. शुभम उर्फ गुब्या संतोष शिंदे (वय २०, सैनिकनगर, भिंगार), करण उर्फ प्रथमेश रामदास भिंगारदिवे (वय २२, रा. गौतमनगर, भिंगार), रुपेश भारत शिंदे (वय २२, रा. सैनिकनगर, भिंगार), प्रशांत उर्फ सोन्या सुनिल भिंगारदिवे (वय २४, रा. सावतानगर पंपींग स्टेशन, भिंगार), अक्षय उर्फ डॉन आण्णासाहेब जावळे (वय २३, रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार), ओंकार उर्फ भैय्या काव्ळु चांदणे, (वय २३, रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार), विशाल उर्फ वजरंग भिम ससाणे (वय २८, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, भिंगार, अहिल्यानगर) आदींना अटक केली असून, यातील प्रताप सुनिल भिंगारदिवे ( रा. पंपिंग स्टेशन, सावतानगर, भिंगार) हा अद्याप फरार आहे.
एसपी राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,
अहिल्यानगर शहर डिवायएसपी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिस ठाणे सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या सूचनेनुसार सफौ. बाबासाहेब अकोलकर, सफौ. रेवननाथ दहीफळे, पोहेकॉ दीपक शिंदे, रवि टकले, पोकॉ. समीर शेख, महादेव पवार, प्रमोद लहारे आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१० जानेवारी २०२५ ला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अक्षय संजय हंपे व त्याचा मित्र करण पाटील असे दोघेजण नगर पाथर्डी रोडवरील फिटनेस जीम येथुन व्यायाम करुन ईलेक्ट्रीक मोपेडवर बसून विजयलाईन चौकाजवळ एस. के. चाय क्लब समोर समोरुन घरी जात होते. या दरम्यान शुभम उर्फ गुब्या संतोष शिंदे ( सैनिकनगर, भिंगार), करण उर्फ प्रथमेश रामदास भिंगारदिवे (रा. गौतमनगर, भिंगार), रुपेश भारत शिंदे ( रा. सैनिकनगर, भिंगार), प्रशांत उर्फ सोन्या सुनिल भिंगारदिवे (रा. सावतानगर पंपींग स्टेशन, भिंगार), अक्षय उर्फ डॉन आण्णासाहेब जावळे (रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार), ओंकार उर्फ भैय्या काव्ळु चांदणे (रा. द्वारकाधीश कॉलनी, भिंगार), विशाल उर्फ वजरंग भिम ससाणे ( रा. इंदिरानगर झोपडपट्टी, भिंगार, अहिल्यानगर), प्रताप सुनिल भिंगारदिवे ( रा. पंपिंग स्टेशन, सावतानगर, भिंगार) यांनी संगनमत करुन गैरकायद्याची मंडळी जमवून अक्षय संजय हंपे याची मोपेड गाडी अडवुन फिर्यादीस गाडीवरुन खाली ओढून तु आमच्याकडे रागाने पाहुन आम्हाला खुन्नस का देतो असे म्हणून अक्षय संजय हंपे याला लाथाबुक्क्याने लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाने मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. व अक्षय संजय हंपे याच्या गळ्यातील चैन बळजबरीने हिसकावून घेऊन निघून गेले, या अक्षय संजय हंपे याच्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं-26/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 119, 118(1), 118(2), 126(2), 115(2), 189(2), 190, 191(2), 191(3) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यातील आरोपी हे आय लव यु नगर भागातील एल.आय.सी. ऑफिसच्या बाजुला चहाचे टपरीवर येणार असल्याची गोपणीय माहिती सहा. पोलीस निरिक्षक जगदीश मुलगीर यांना मिळाली, त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात एक टीम तयार करुन संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करण्याचे सूचना दिल्या. भिंगार कॅम्प पोलिस टीमने माहिती ठिकाणी जाऊन सापळा लावला असता थोड्या वेळातच गुन्ह्यातील आरोपी तेथे आले. त्यांना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते पळून जाण्याचे तयारीत असताना त्यांचा पाठलाग करुन त्यांना शिताफिने ताब्यात घेतले. आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी दि.१८ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. तसेच आरोपी प्रताप सुनिल भिंगारदिवे हा गुन्हा घडल्यापासुन फरार झालेला आहे.