संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
चिंचपुर पांगुळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडसाद बीडमध्ये उमटू लागल्यानंतर आता नगर जिल्ह्यात सुद्धा भाजप पदाधिकाऱ्याचे राजीनामा सत्र सुरू झाले आहे. भाजपाचे उपाध्यक्ष धनंजय पा. बडे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजप खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये टोकाची नाराजी पसरली आहे. त्याचे पडसाद म्हणून पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरूच आहे.
अहमदनगरचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष धनंजय दगडू पा. बडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा भाजप जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिला. बडे पा. यांच्या सोबत रविवारी दिवसभरात 25 जणांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा देणाऱ्यांमध्ये उपाध्यक्ष गोकुळ दौंड, नगर जिल्हा युवामोर्चा सरचिटणीस सचिन पालवे, पाथर्डी तालुका अध्यक्ष माणिक खेडकर, महिला आघाडीच्या सौ. काशीबाई गोल्हार, माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, विद्यमान नगराध्यक्ष डॉ मृत्यूजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, तालुका सरचिटणीस नागनाथ गर्जे, पाडळी सरपंच बाजीराव गर्जे, पाथर्डी शहरअध्यक्ष अजय भंडारी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन वायकर, युवा मोर्चा चिटणीस बाबुराव बांगर, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष युसुफ भाई शेख, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष आप्पासाहेब शिरसाट, बूथ प्रमुख अजित शिरसाठ, रामहरी खेडकर, आंबादास पालवे, सुनिल पाखरे आदींनी आपले राजीनामे धनंजय बडे यांच्या सोबत जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे दिले आहेत.
खासदार डॉ. प्रितम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरू होताच जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांसह विविध पदावरील नेत्यानी राजीनामे दिले आहेत.
भाजपचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सर्व राजीनामे सुपूर्द करण्यात आले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पा. बडे हे पंकजाताईचे अत्यंत जवळचे नातेवाईक तथा पाथर्डी शेवगावचे माजी आमदार कै.दगडू पा. बडे यांचे चिरंजीव आहेत. बडे पा. यांची आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी टाकळीमानूर गटासाठी प्रमुख दावेदारी मानले जात आहे. तशी तयारी माजी सरपंच धनंजय पा. बडे यांनी भक्कमपणे केलेली आहेे. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, तशी चर्चा पाथर्डी तालुक्यातील कार्यकर्ते व सामान्य नागरिकांमध्ये केली जात आहे. पाथर्डीसह शेवगाव, जामखेड तालुक्यात बडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
यावेळी धनंजय पा.बडे म्हणाले की, स्व .मुंडे साहेबांनी तळागाळातील कार्यकर्ता घडविला व समस्त सर्व ओबीसी समाजाजाला भाजपाच्या झेंड्याखाली एकत्र आणले. असे असताना त्यांच्यामागे पक्षामध्ये काही झारीतील शुक्राणू यांच्यामुळे मुंडे भगिनी व समर्थक यांना दुय्यम वागणूक मिळत आहे.
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर डावलले गेलेे होते. त्यामुळे माझ्यासह सामान्य माणसाला सुद्धा असे वाटत होते की, खा प्रितमताईंना केंद्रात काम करण्यासाठी मोठी जबादारी मिळेल. परंतु केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात ती संधी मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. आणि म्हणून त्यांच्या भावनेची कदर करत आम्ही सर्वांनी मिळून राजीनामा दिला आहे.”
संकलन – सोमराज बडे मो-९३७२२९५७५७