👉शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी उघडकीस आणला ३३ लाखांचा घोटाळा
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोंना काळात देखील भ्रष्ट मार्गाने काळा कारभार करण्याचा प्रकार सुरूच आहे. नगरचे पूर्वीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरब्बीकर आणि विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला आहे. अधिकारी आणि हे सीसीटीव्ही पुरविणारा ठेकेदार यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचे दिसते आहे. ८ पट जास्त दराने सीसीटीव्ही यंत्रणा खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी माहिती अधिकारात याबाबतचे पुरावे गोळा केले. त्यावरून हेच सिद्ध होते आहे. की अवघ्या चार ते ५ लाख रुपयांना मिळणारी सामुग्री कागदोपत्री ३८ लाख रुपये खर्चून बसविण्यात आली.
याबाबत जाधव यांनी आरोग्य मंत्रायल, आरोग्य उपसंचानालय नाशिक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करावी आणि जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची नोंद करून त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. संबंधित ठेकेदाराकडून ही रक्कम वसूल करून त्याला देखील अटक करण्यात यावी असे त्यांनी म्हंटले आहे.
हा सीसीटीव्ही खरेदी घोटाळा सिद्ध करणारी सर्व कागद पत्रे जाधव यांनी या अर्जासोबत जोडली आहेत. सरकारी नियमाप्रमाणे इतकी मोठी रक्कम खर्ची होत असल्याकारणाने शासनाच्या जेम या पोर्टलवर अधिकृत इ टेंडरिंग करून त्या पोर्टलवरूनच या साहित्याची खरेदी होणे आवश्यक होते मात्र तसे न करता फक्त ठेकेदाराकडून तीन वेगवेगळी कोटेशन घेऊन ही यंत्रणा बसविण्याची वर्क ऑर्डर काढण्यात आली. आणि शासनाला तब्बल ३३ लाख रुपयांचा चुना लावण्यात आला.
कोरोनाच्या काळात दुकाने बंद असल्या कारणाने वस्तू या चढ्या भावाने मिळत असल्याचे कारण यासाठी देण्यात आले आहे. त्याच प्रमाणे हे इ टेंडरिंग न करता कोटेशन मागवून काम देण्याची सूट या अधिकाऱ्यांनी आपल्या मनानेच घेतली. तशी तरतूद त्यांनी या कराराच्या अटी शर्ती मध्ये अगोदरच करून ठेवली. यामुळे घोटाळा करण्याच्या सर्व मार्गांना मोकळीक देणाऱ्या सर्व नियमांची सूट त्यांनी घेतली. विशेष म्हणजे सध्या जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले डॉ. सुनील पोखरणा हे त्यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून काम पाहत होते. त्यांच्याच देखरेखीखाली हा सी सी टी व्ही खरेदी मध्ये हेराफेरी झाली.
९ ऑगस्ट ला नाशिकचे आरोग्य उपसचालक डॉ. एम आर पट्टणशेट्टी यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना हे सी सी टीव्ही बसविण्याची परवानगी दिली. त्यात त्यांनी ही साहित्य खरेदी ई टेंडरिंग करून करावी असे नमूद केले होते. त्या अगोदर २३ जुलैला टेंडर काढण्यात आले . ई टेंडरिंग न करता किंवा कोणत्याही पेपर मध्ये जाहिरात न देता फक्त जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नोटीस बोर्डवर ही टेंडर नोटीस फक्त चार दिवस लावण्यात आली होती. त्या काळात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरचे सी सी टी व्ही बसविणारे ठेकेदार रुग्णालयात जाऊन नोटीस पाहू शकत नव्हते. लगेच २९ आणि ३० तारखेला तीन टेंडर प्राप्त झाले. त्यातील माउली एंटर प्रायजेस आणि सिद्धांत एंटर प्रायजेस या दोन्ही ठेकेदार संस्थांचा पत्ता एकच आहे. तिसरा ठेकेदार सॅम कॉम्प्युटर्स यांना तर सी सी टी व्ही विकण्याचा अनुभव देखील नाही . फक्त नावाला त्यांचे कोटेशन घेण्यात आले आणि सिद्धांत एंटर प्रायजेस ला ३८ लाख ३० हजार ९१ रुपयांचे काम देण्यात आले. एक जुलै ला त्यांना वर्क ऑर्डर देण्यात आली. त्यानंतर नाशिक उपसंचालकांना हे दर पत्रक मंजुरीसाठी पाठविण्यात आले. या प्रस्तावाला मंजुरी देताना विभागीय उपसंचालकांनी हे खरेदी जेम पोर्टल वर इ टेंडरिंग करूनच करावी असे नमूद करण्यात आले होते . मात्र तसे न करता त्यांनी सिद्धांत एंटर प्रायजेसकडून काम करून घेतले. आणि नंतर बिल पण अदा केले. बिल देताना त्यावर तारीख वार याचा कोणताही उल्लेख नाही.
हा घोटाळा गिरीश जाधव यांनी उघडकीस आणला असून असे गैरप्रकार रोखण्यासाठी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आणि भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचारी गजाआड गेलेच पाहिजे नाहीतर काळ सोकावल्याशिवाय राहणार नाही असे जाधव यांनी नमूद केले आहे.