कडगाव शिवारातील खून प्रकरणी ३ आरोपी अटक ; नगर एलसीबी टिम’ची कामगिरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारात चोरीच्या उद्देशाने शेतमालकाचा खून करणाऱ्या तिघांना अहमदनगर एलसीबी टिम’ने पकडले आहे. भाऊसाहेब अशोक निकम (वय२२, रा. लोहगांव, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर), अशोक संजय गिते (वय २३), श्रीकांत रावसाहेब सुर्यवंशी (वय २०, दोन्ही रा. कडगांव मिरीरोड, ता. पाथर्डी) अशी पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सपोनि हेमंत थोरात, पोसई मनोहर शेजवळ, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, सुरेश माळी, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, गणेश भिंगारदे, संदीप चव्हाण, संतोष लोढे, संदीप दरदंले, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ अमृत आढाव, किशोर शिरसाठ व चापोहेकॉ उमाकांत गावडे, चंद्रकांत कुसळकर आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीमती. सुमनबाई कारभारी शिरसाठ (वय ५५, रा. कडगाव शिवार, ता. पाथर्डी) यांचे पती कारभारी रामदास शिरसाठ (वय ५९) हे त्यांचे घराजवळ असलेल्या शेतातील पत्र्याचे शेडमध्ये कापसाच्या गोण्याला राखण झोपलेले असताना दि.१० नोव्हेंबर २०२३ ला रात्री कोणीतरी अनोळखी इसमांनी शेडमधील कापसाच्या ७-८ गोण्या चोरुन नेताना यातील मयत कारभारी यांनी विरोध केला असता, अनोळखी आरोपींनी मयतास मारहाण करुन जिवे ठार मारले आहे. या घटनेच्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११४८/२०२३ भादविक ४६०, ३०२ प्रमाणे चोरीच्या उद्देशाने खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एलसीबी टिम’ने लागलीच घटना ठिकाणास भेट देऊन परिसरात फिरुन रेकॉर्डवरील आरोपी, कापूस विकत घेणारे व्यापारी तसेच मयताचे शेतावरील शेतमजुराबाबत माहिती घेऊन दि.१३ नोव्हेंबर २०२३ रोजी संशयीतांची नावे निष्पन्न करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल व बारकाईने विचारपुस करता आरोपी भाऊसाहेब अशोक निकम, अशोक संजय गिते, श्रीकांत रावसाहेब सुर्यवंशी यांनी त्यांचा फरार साथीदार करण अजिनाथ कोरडे (रा. कडगांव, ता. पाथर्डी याच्यासह मयत कारभारी शिरसाठ यांच्या शेतावर जाऊन पत्र्याचे शेडमधील कापसाच्या गोण्या चोरुन नेताना कारभारी शिरसाठ हे झोपेतून उठल्याने व त्याने आरोपींना ओळखल्याने मयताचे नाक व तोंड दाबून जिवे ठार मारल्याची कबुली दिल्याने आरोपींना ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास पाथर्डी पोलिस करीत आहे.
आरोपी अशोक संजय गिते हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्याविरुध्द अहमदनगर, बीड, पुणे जिल्ह्यामध्ये चोरी, व दुखापतीचे ६ गुन्हे दाखल आहेत.