ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरामध्ये विकासाच्या नावाखाली रस्ते खोदले : डॉ.अनिल आठरे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर– ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरामध्ये विकासाच्या नावाखाली रस्ते खोदून ठेवले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून त्याचा व्यवसायावर परिणाम होण्याचा धोका आहे. त्यामुळे हे कामे तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले उमेदवार डॉ. अनिल आठरे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळही आपल्याला यासंदर्भात भेटून लक्ष वेधले होते. दरम्यान राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाची शिवराज्ययात्रा नगरमध्ये येत असून शुक्रवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता नंदनवर गार्डन येथे सभेचे आयोजन करण्यात आले असलयाचेही डॉ. आठरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यात शिवराज्य यात्रेच्या निमित्ताने दौरा सुरु आहे. नगरध्ये ही यात्रा मुक्कामी असून या शुक्रवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, हे या सभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. असेही डॉ. आठरे यांनी सांगितले. दोन महिन्यांपुर्वी शरद पवार यांनी आपल्याला बोलावून कामाला लागण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आपणही निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचेही डॉ. आठरे यांनी सांगितले.
ताबेबहाद्दरांवर कारवाई करा
नगर शहराविषयी बोलताना डॉ. आठरे यांनी सांगितले. नगर शहराची अत्यंत वाईट अवस्था आहे. युवकांना रोजगार नसल्याने ताबेगिरीकडे वळली असून एमआयडीसीमध्येही मोठ्या कंपन्या नाही. ज्या कंपन्या आहेत त्याही कंपन्यांध्ये संघटनांमुळे कंपन्याचे व्यवस्थापन अडचणीत आहे. ताबेगीरी ही मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांमध्येही संतापाची लाट आहे. तरुण वर्गाकडून अशा गोष्टी करून घेतल्या असल्याने त्यामागील मास्टरमाईटवरही कारवाई करणे आवश्यक आहे. नगर शहरामध्ये अद्यावत सुखसुविधा नसून शैक्षणिक परिस्थितीमुळे अनेक तरुण उच्च शिक्षणासाठी बाहेर गावी जात आहे. त्यामुळे नगर शहरात उच्च शिक्षणासाठी पोषक वातावरण नाही. तसेच एमआयडीसीची अवस्थाही अत्यंत बिकट आहे. एमआयडीसी वाढीसाठी भरिव योगदान नसल्याने अनेक तरुणांनाही रोजगारासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्याचप्रमाणे भिंगारमध्येही कचरा, जॉगिंग पार्क, उद्यान चांगले नाही तसेच भिंगार वेशीचा प्रश्न, वाहतुकीचा प्रश्न असे अनेक प्रश्नही असून तेथील नागरिकांना दिलासा देण्याच काम आपण भविष्यात निश्चित करणार असल्याचे डॉ. आठारे यांनी सागितले.