पुणे – राज्यात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा कहर सुरु आहे. राज्यात आजही अनेक ग्रामीण जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या दुप्पटीने वाढल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम,सणसमारंभावर निर्बंध आले. पंढरपूरची आषाढी वारीही गेल्या वर्षी रद्द करण्यात आली. याच संदर्भात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा केली. वारकऱ्यांचे पालखी सोहळ्याबाबतची मते जाणून घेतली. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच वारकऱ्यांच्या आरोग्याचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. योग्य वेळ आल्यावर अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वांच्या मते घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळा त्याचप्रमाणे पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेकडो वर्षांची परंपरा आहे. राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. काही महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यात म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण देखील वाढले आहे. मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायांनी सरकारला मोलाची मदत केली. तरीही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी वारकरी संप्रदायांनी मांडलेली भूमिका येत्या आठवड्यात होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल व यावर सर्वाच्या मते निर्णय घेण्यात येईल, असे अजित पवार यांनी सांगितले.