संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नाशिक – आयपीएल मॅचचे बेटिंग सुरू ठेवण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देवळाली कँम्प येथे नाशिक ग्रामीण पोलीस दलातील क्राईम ब्रँचच्या पोलीस उपनिरीक्षक व एका खासगी व्यक्तीस अटक केली. पोलीस उपनिरीक्षक महेश वामन शिंदे (वय ३८), संजय आझाद खराडे (वय ४५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
महेश शिंदे यांची नेमणूक नाशिक ग्रामीण पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेत केली गेली आहे. तक्रारदाराचे देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आयपीएल क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरु असल्याची तक्रार पोलीस ठाण्यापर्यंत आल्या. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि आयपीएल मॅच बेटिंगचा धंदा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी शिंदे यांनी सोमवारी (दि.२५) तक्रारदाराकडे ४ लाख रुपयांची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शहानिशा करुन सापळा रचला. गुरुवारी (दि.३०) शिंदे यांच्या सांगण्यावरुन संजय खराडे यांनी तक्रारदाराकडून ३ लाखांची लाच स्विकारली.