👉जिल्हास्तरीय साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन २०२३चे १० ते १४ फेब्रुवारीला आयोजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या संकल्पनेतून तिन्ही विभागांचा एकत्रित यात जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या सयुंक्त विद्यमाने दि. १० ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज मैदान, लालटाकी रोड, अहमदनगर येथे साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन २०२३’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी या जिल्हास्तरीय साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन २०२३ चे उद्घाटन दु.३ वाजता राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्या हस्ते होणार आहे, तसेच अहमदनगर महोत्सव लाॅगोचे अनावरण होणार आहे,अशी माहिती जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर यांनी दिली.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सुनिल तुंबारे, कृषी विभागाचे रविंद्र माने, उमेद अभियानाचे सोमनाथ जगताप, श्री साळवे आदिंसह जिल्हा परिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या पाच दिवस चालणाऱ्या जिल्हास्तरीय साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन २०२३ मध्ये उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता समूहांनी उत्पादीत केलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री तसेच खाद्य पदार्थाची विक्रीसाठी एकूण ३०० स्टॉल, कृषी विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरे करण्याच्या दृष्टीने धान्य, फळे, कृषि औजारे व कृषि निविष्ठा यांचे प्रदर्शनासाठी २२० स्टॉल, पशुसंवर्धन विभागाचे पशु-पक्षी, पशुधन, विविध जातींची चारापिके यांचे प्रदर्शनासाठी २० स्टॉल आणि शासकीय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रम शेतकरी व नागरिकांना माहिती होण्यासाठी विविध शासकीय विभागांचे ३० स्टॉल लावण्यात येणार आहेत. अहमदनगर महोत्सवात असे एकूण ५७० स्टॉल लावण्यात येणार आहेत.
यामध्ये उमेद अभियान अंतर्गत जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता तयार केलेली उत्पादने व चटपटीत अस्सल गावरान खाद्य पदार्थांची विक्री, पौष्टिक तृणधान्यां पासून बनवलेले खाद्य पदार्थांची विक्री, हस्तकला, मसाले यांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येणार आहे.
कृषि विषयक आधुनिक तंत्रज्ञान अवगत होण्याच्या दृष्टीने यात प्रामुख्याने शेतीसाठी लागणारी औजारे, खते, बी-बियाणे, संरक्षित शेती, सूक्ष्म सिंचन, अपारंपरिक ऊर्जा, बायोफर्टीलायझर, कृषि साहित्य व शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्रीची साखळी निर्माण व्हावी या संकल्पनेतून धान्य व फळे महोत्सवाचे आयोजन केले आहे.
पशुसंवर्धन विभागांतर्गत भव्य पशू-पक्षी, पशुधन व विविध जातींच्या चारा पिकांचे प्रदर्शन आयोजित केलेले असून त्यात जगातला सगळ्यात जास्त उंचीचा तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन हरियाणा मुरा जातीचा बारा कोटीचा दारा रेडा, मु-हा, मेहसाना, पंढरपुरी, सुरती इत्यादी म्हशींचा तसेच देशी गायींमध्ये गीर, डांगी, साहिवाल, खिलार, पुंगानुर, विदेशी जातींमध्ये जर्सी, होलस्टीन फ्रीजीयन या पशुधनाचा समावेश आहे. त्याबरोबर शेळ्या, मेंढया, घोडे, वराह, श्वान तसेच पक्षांमध्ये लव्ह बर्डस, टर्फी, फाऊल, फायटर कॉक, डक व विविध जातींच्या कोंबड्यांचा समावेश असणार आहे.
बच्चे कंपनीसाठी आनंदमेळा (फनफेअर) या सोबतच दररोज सायंकाळी विविध मनोरंजनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रदर्शन दि. १० फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत दररोज सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू असणार आहे. सर्व अहमदनगरकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन विविध वस्तूंची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलाचा उत्साह वाढवावा असे आवाहन जिल्हाधिकारी राजेद्र भोसले व जिल्हा परिषद सीईओ आशिष येरेकर यांनी केले आहे.