आपल्याला ऑलम्पिक वीर पैलवान निर्माण करता आला नाही ः केंद्रीयमंत्री मोहोळ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : लाल मातीतील कुस्ती ही विचार करायला लावणारी आहे, आपण मागे पडलो आहोत. हे खरे असून आपल्याला ऑलम्पिक वीर पैलवान निर्माण करता आला नाही, यापुढे सर्वांनी एकत्र येऊन लाल मातीचे गत वैभव पुन्हा मिळून द्यायचे आहे, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतून चांगले मल्ल निर्माण करून देशाचे प्रतिनिधित्व करतील, खेळाडूंचे मनोधर्य व लोकप्रियता वाढविण्यासाठी राजश्रय मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम केले, असे प्रतिपादन केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.
अहिल्यानगर वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील माती पूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आ. तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, आ. शिवाजीराव कर्डिले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पै.रामदास तडस, माजी आ.अरुणकाका जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै.संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव बर्डे, सरचिटणीस हिंदकेसरी पै.योगेश दोडके, अशोक शिर्के, माजी उपमहापौर गणेश भोसले, संतोष भुजबळ, कुमारसिंह वाकळे, संपत बारस्कर, अविनाश घुले, पैलवान अनिल गुंजाळ, रवींद्र कवडे, युवराज करंजुले, सुभाष लोंढे, शिवाजी चव्हाण, प्रवीण घुले, शिवाजी कराळे, रामदास आंधळे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते.
केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले की, पैलवानांच्या मानधनात वाढ केली आहे. लाल मातीशी नाते असणारा माणूस ही स्पर्धा यशस्वी करू शकतो म्हणून आमदार संग्रामभैय्या जगताप हे महाराष्ट्र केसरी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडतील. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची वैभवशाली परंपरा असून छबुराव रानबोकेपासून बर्डे पर्यंत चांगले पैलवान निर्माण झाले आहे. त्यामुळे येथे होणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा निश्चितपणे मोठी आणि यशस्वी होईल. खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविणारा पैलवान आपल्याकडे झाला नाही. त्यामुळे अशा स्पर्धेतून कुस्तीमध्ये देशाचे नेतृत्व करणारे कुस्तीगीर घडविण्याची गरज आहे. स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन झाल्यास कुस्तीगीरांना प्रेरणा मिळते. अहिल्यानगरमध्ये होणारी स्पर्धा कुस्ती क्षेत्राला नवी ऊर्जा देण्यात यशस्वी ठरेल. पैलवान हुशार असतो तो एक मिनिटात 50 डाव टाकत असतो त्याच्या इतके हुशार होनीच नसतं आता आम्ही सर्वजण कुस्तीला बदनाम होऊन देणार नाही. महाराष्ट्रातल्या मातीतल्या या खेळाला शासनाने भरीव अर्थसहाय्य दिले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी 1 कोटी रुपये देण्याचा आणि महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरींच्या पुरस्कार रकमेतही वाढ करण्याचा निर्णय शासनाने यापूर्वीच्या स्पर्धेच्यावेळी घेतला आहे.
आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप म्हणाले, महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्व आहे. दि.29 जानेवारी ते दि.2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्ह्याला कुस्तीची गौरवशाली परंपरा आहे. हे वैभव आणखी वाढविण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेकडे देशाचे लक्ष असून ते कुस्ती पाहण्यासाठी येत असतात. नगर जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे असून नगर दक्षिणला विमानतळ होण्यासाठी मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयत्न करावे असे ते म्हणाले.
आमदार शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, कुस्तीमुळे शरीर निरोगी आणि मन शुद्ध रहाते. जीवनात नवी ऊर्जा मिळते. लाल मातीत श्रम करताना पैलवानांनी चुकीच्या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कुस्ती क्षेत्र आता मागे पडत चालले असून क्रिकेटला महत्व प्राप्त झाले आहे. आता आपल्या सर्वांना पूर्वी प्रमाणे मान सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. व्यायामामुळे आमच्या वयाची जाणीव होत नाही, आजच्या तरुणांना आम्ही लाजवेल. लाल मातीचा व्यायाम व शिक्षण घेणार्यांची संख्या कमी होत चालली आहे. जिमकडे आकर्षित झाले आहे, स्पर्धेच्या निमित्ताने पैलवानांना प्रोत्साहन दिल्यास त्यांना पुढील कारकिर्दीसाठी ऊर्जा मिळेल. नगर दक्षिण भागावर नेहमीच अन्याय झाला असून जिल्ह्यातील प्रस्थापित लोकांशी संघर्ष करत असताना पैलवानकीमुळेच डावपेच कामी आले असे त्यांनी म्हटले.
पै.रामदास तडस म्हणाले, महाराष्ट्रातील कुस्तीगीरांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश संपादन केले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कुस्तीगीरांना चांगल्या सुविधा दिल्या जात आहेत. त्यांनी ऑलिंपिक, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेत चांगले यश मिळावे यासाठी प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुस्तीगीरांना राजाश्रय देण्याचे, त्यांना शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे कार्य केले. कुस्तीच्या विकासासाठी तालुका पातळीवर मॅटची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
संतोष भुजबळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी, कुस्तीप्रेमी नागरिक उपस्थित होते.