अहिल्यानगरातून आमदार संग्रामभैय्या जगतापांची मंत्रिमंडळात वर्णी लागावी ; नेते अजित पवारांकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर : जिल्ह्यात महायुतीच्या पदरात मतांचे भरभरून दान टाकले. १२ जागांपैकी तब्बल १० जागांवर महायुतीला यश मिळाले. महायुती सरकार स्थापन होईल, यात जिल्ह्यातून कोणत्या पक्षाच्या कोणत्या आमदारांची मंत्रिपदावर वर्णी लागणार, याबद्दल चर्चा होत आहे. अहिल्यानगरमधून तिस-यांदा निवडून आलेले संग्रामभैय्या जगताप यांना मंत्रिपद मिळावेत, यासाठी अनेक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे गटनेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातून सर्वात ज्येष्ठ मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्थान हमखास समजले जात आहे. जिल्ह्यात भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४, शिवसेना (शिंदे गट) २ असे संख्याबळ महायुतीला मिळाले आहे. निवडणूक निकालानंतर ही सर्व आमदार मुंबईत पोहोचली आहेत. मंत्रिपदी किमान राज्यमंत्रिपदी वर्णी लागावी, यासाठी काहींचे प्रयत्न सुरू आहेत. महायुतीत तीन घटक पक्ष असल्यामुळे व संख्याबळानुसार, पहिल्या टप्प्यात किती जणांची वर्णी लागणार याचे सूत्र कसे असेल याचीही चर्चा होत आहे. त्यातूनच जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदे मिळणार याकडे लक्ष लागलेले आहे. राधाकृष्ण विखे पाटील ८ व्यांदा विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी अनेक वर्षे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात हमखास समावेश असेल, असे मानले जाते. त्यांच्याकडे पूर्वीचे महसूल खाते असेल की, अन्य कुठली जबाबदारी दिली जाईल, याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यात भाजपच्या मोनिकाताई राजळे व राष्ट्रवादीचे आमदार संग्रामभैय्या जगताप सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून मंत्रिपदाची मागणी होत आहे. निकालानंतर लगेचच त्या आशयाचे फलक पाथर्डी व नगर शहरात ठिकठिकाणी लागले आहेत. भाजपचेच शिवाजीराव कर्डिले सन २०१९ चा अपवाद वगळता पुन्हा निवडून गेले आहेत. तेही मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. यापूर्वी त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.
मात्र त्यांच्याकडे सध्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे व आशुतोष काळे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. काळे विक्रमी मतांनी विजयी झाले. काळे यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लाल दिव्याचे आश्वासन दिले होते.
याकडे त्यांचे समर्थक लक्ष वेधत आहेत. राज्यातच महायुतीला भरघोस जागा मिळाल्या आहेत. संख्याबळानुसार मंत्रिपदांची विभागणी होईल. त्यामध्ये जिल्ह्याच्या वाट्याला किती मंत्री पदे मिळणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.