संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सुपूत्र डॉ. दत्ताराम राठोड हे आपल्या अपार मेहनतीने आणि विद्वत्तेने यशाचे नवनवे शिखर सर करत आहेत. त्यांना दि. 23 मार्च 2025 रोजी अमरावती येथे होणार्या अखिल भारतीय प्रतिभा समारोहात ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2025’ प्रदान करण्यात येणार आहे. हा त्यांचा प्रशासन, शिक्षण, संशोधन आणि साहित्य क्षेत्रातील भरीव योगदानाचा भव्य गौरव आहे.
सध्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक (रेल्वे), नागपूर या पदावर कार्यरत असलेल्या डॉ. राठोड यांनी एम. पी. एस. सी. चार वेळा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत आपले स्थान निर्माण केले आहे. एवढेच नव्हे, तर सेट आणि नेट परीक्षा (2023) उत्तीर्ण करून शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी स्वतःची ओळख सिद्ध केली आहे. 26 उच्च शिक्षण पदव्या आणि 4 पीएच.डी. असलेल्या डॉ. राठोड यांचे महाराष्ट्रात अनोखे स्थान आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी घेतलेली
भरारी ही अभूतपूर्व असून, 10 संशोधन लेख आणि 1 प्रकाशित पुस्तक यांसह अनेक साहित्यिक योगदान त्यांनी दिले आहे.
त्यांनी ’लोक साहित्य समाज आणि लोकशाही’, ’भारतीय तत्वज्ञानात योगदान’, ’21 व्या शतकातील राष्ट्रविचार’, ’मराठी साहित्य आणि बदलते प्रवाह’ यांसारख्या संशोधनात्मक ग्रंथांची निर्मिती केली आहे. त्यांच्या विद्वत्तेची दखल घेत त्यांना गडचिरोली येथे उत्कृष्ट सेवा पुरस्कार, शब्दगंध साहित्यिक परिषद अहिल्यानगरचा 2025 चा सन्मान, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट प्रशासक व संशोधक असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. विशेष म्हणजे, मागील वर्षीच त्यांना ’ग्लोबल गोल्ड नॅशनल टॅलेंट अवॉर्ड 2024’ प्रदान करण्यात आला होता. त्याच सन्मानाचा ध्यास घेत त्यांनी यावर्षी देखील एक नवा उच्चांक गाठला आहे. त्यांच्या ज्ञानसंपन्नतेचा आणि कर्तृत्वाचा गौरव करताना त्यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. प्रशासकीय सेवा, शिक्षण, संशोधन आणि साहित्य या चारही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या ऐतिहासिक योगदानामुळे ते महाराष्ट्रातील युवकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत. डॉ. दत्ताराम राठोड यांना पुरस्कार जाहीर झाल्यानेे पोलिस दल वरिष्ठ अधिकारी, अन्य प्रशासकीय अधिकारी, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. दत्ताराम राठोड यांचे विशेष अभिनंदन केले आहे.