संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरणाची 8 ते 10 दिवसांत चौकशी पूर्ण करण्याची अपेक्षा आहे. या प्रकरणांशी संबंधित अधिका-यांची माहिती घेतली जात असून अद्यापपर्यंत कोणत्याही मतपर्यंत पोहचलो नसल्याची माहिती नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी (दि.11) जिल्हा रुग्णालय जळीतकांड प्रकरण चौकशी समितीच्या बैठकीनंतर पञकारांशी बोलताना दिली.
श्री गमे पुढे म्हणाले, आजच्या बैठकीत घटनेशी संबंधित बांधकाम विभाग, महापालिका अधिकारी, अग्निशमन अधिकारी तसेच अन्य तज्ञ्जांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. आजच्या चौकशीत अधिका-यांकडून प्राथमिक माहिती घेतली आहे, अजून माहिती मागवली असून, पुढील सोमवारपर्यंत माहिती येणं अपेक्षित आहे.
दरम्यान विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चौकशी समिती बैठकीत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, चौकशी अधिकारी उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.