अहमदनगर क्राईम बुलेटिन

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork

📥📥📥📥📥

नोकरीचे आमिष दाखवून १६ युवकांची फसवणूक
Nagar Reporter
अहमदनगर :
नोकरीचे आमिष दाखवून १६ युवकांची तब्बल ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याप्रकरणी नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे आरोपी दिनेश बबनराव लहारे-तांबे (रा. अरणगाव, ता.नगर). रमजान अल्लाबक्ष शेख (टाकळी खातगाव, ता.नगर) आणि जावेद पटेल (गंगापूर) या तिघांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सौरभ भारत शिंदे (वय २५, रा. कोळगाव, ता. श्रीगोंदे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कराड येथे सैन्य भरतीसाठी ॲकेडमीत प्रवेश घेतला होता. दरम्यान, दिनेश बबनराव लहारे-तांबे (वय ५०, रा. हनुमाननगर, अरणगाव, ता.नगर) आणि रमजान अल्लाबक्ष शेख (वय ४५, रा. टाकळी खातगाव, ता. नगर) या दोघांचे कोळगाव येथे येणे-जाणे होते. त्यातून दोघांशी ओळख झाली. या दोघांनी जिल्हा न्यायालयात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यातून अहमदनगर येथील माळीवाडा भागातील अग्नीशामक दलाजवळ दि. १० फेब्रुवारी २०२१ ते दि. २१ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत धनादेश, डी.डी. तसेच एनईएफटीद्वारे तसेच रोख स्वरूपात असे एकूण १५ लाख रूपये दिले.
त्यानंतर त्यांनी जावेद पटेल याच्याशी ओळख करून दिली. या सर्वांनी मिळून दि. १७ जून २०२१ रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबईचे नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर बाळासाहेब देशपांडे रक्तपेढीत नोकरीस लावले. या ठिकाणीचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात नोकरीस लावले. त्यांनी नोकरीस लावल्याने त्यांच्यावर विश्‍वास बसला. त्यांनी आणखी ओळखीचे कोणी असल्यास नोकरीला लावण्याचे आमिष दाखविले. त्यानुसार स्वप्नील विजय शिंदे (४ लाख ५० हजार), अतुल जालिंदर धोंडे (४ लाख ६० हजार), सागर गोपीनाथ अनारसे (४ लाख ३५ हजार), कुलदीप लगड (४ लाख ६० हजार), वैभव शिंदे (५ लाख २९ हजार), सिध्दांत प्रदीप भिंगारदिवे (५ लाख ३० हजार), प्रफुल्ल रामदास वैराळ (४ लाख ४०), अजिंक्य आदिनाथ तुपे (५ लाख ४५ हजार), गोविंद आदिनाथ तुपे (४ लाख ९५ हजार), पायल प्रदीप भिंगारदिवे (६ लाख १५ हजार), संदीप झुंबर शिंदे (४ लाख २४ हजार), जालिंदर दत्तात्रय खेतमाळीस (७ लाख ७५ हजार) याच्याकडून धनादेश. धनाकर्ष (डी.डी.) तसेच ऑनलाईन पद्धतीने पैसे घेतले. काही रक्कम रोख स्वरूपात असे एकूण ७१ लाख २८ हजार रूपये स्वीकारले. भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक आणि बडोदा बँकेच्या खात्यातून ही रक्कम स्वीकारली आहे. बीड येथील पवार गल्लीत राहणारे शहबाज हमीद शेख यांच्याकडून ही ७ लाख रूपये घेतले.तरूणांनी वारंवार नोकरीबाबत विचारणा केली. त्यावर आरोपींनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. सर्वांकडून एकूण ८६ लाख २८ हजार ५०० रूपये घेतले.
👉असा फसवणुकीचा प्रकार उघड
आरोपी हे नोकरीचे आमिष दाखवून युवकांना फसवित आहेत. त्याबाबत ठाणे जिल्ह्यात एक गुन्हा दाखल झाला. दिनेश लहारे-तांबे याच्या भांडूप (मुंबई) येथे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात विविध शासकीय कार्यालयांचे बनावट लेटरहेड, शिक्के असे साहित्य आढळून आले. याबाबत बातम्या प्रसिध्द झाल्या. त्यानंतर नोकरीच्या आमिषाने पैसे दिलेल्या युवकांनी दि. ३ डिसेंबर आणि दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. त्यानंतर न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार फसवणुकीचा गुन्हा तिघांवर दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे पुढील तपास करीत आहेत.

व्हिडिओ माध्यमातून महिलेला ४ लाखांची खंडणी
Nagar Reporter
अहमदनगर :
अश्‍लिल व्हिडिओच्या आधारे महिलेला ४ लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या दोघा युवकांवर तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय हरिभाऊ तागड (रा. तागडवस्ती, तपोवन रस्ता), मयूर मतकर (तपोवन रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

अक्षय तागड या तरूणाची काही वर्षांपूर्वी सावेडी भागातील एका विवाहित महिलेशी ओळख झाली होती. त्यातून त्याने मोबाईल नंबर घेतला. अक्षय याने जानेवारी २०२३ मध्ये महिलेचा एक अश्‍लिल व्हिडिओ तयार केला. त्याने हा व्हिडिओ मयूर मतकर याला पाठविला. मयूर याने दि. २७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता विवाहित महिलेला हा व्हिडिओ व्हॉटसअपद्वारे पाठविला. फोन करून हा व्हिडिओ प्रसारित न करण्यासाठी ४ लाखांच्या खंडणीची मागणी केली.
महिलेने या व्हिडिओमुळे आपला संसार मोडला जाईल. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल न करण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघे ही ४ लाखांच्या खंडणी मागत राहिले. ४ लाख रूपये न दिल्यास दुकानाचे नुकसान करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून गेली. तिने आई-वडिलांना तसेच जवळच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी मानसिक आधार दिला. त्यानंतर महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली, त्यानुसार आरोपी अक्षय तागड आणि मयूर मतकर या दोघांविरूद्ध खंडणी मागणे, अश्‍लिल व्हिडिओ तयार केल्याबद्द्ल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनपाच्या मोकळ्या जागेत गांजाची नशा करणा-यास तरूंगाची हवा
Nagar Reporter
अहमदनगर :
महापालिकेच्या मोकळ्या जागेत गांजा ओढणाऱ्यास पोलिसांच्या गस्ती पथकाने पकडले आहे. अंमली पदार्थ आणि नशा आणणारे पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश आदित नागापुरे (वय २४, रा. ब्रम्हतळे, आलमगीर, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे शुक्रवारी (दि.३) रात्री ९ वाजता पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घातल होते. त्यावेळेस महापालिकेच्या बेग पटांगणाजवळ एक तरूण गांजा ओढत असल्याचे आढळून आले. पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे गांजा ओढण्यासाठीची चिलीम, काडची पेटी असे साहित्य आढळून आले. त्याला नाव विचारले असता, त्याने अविनाश आदित नागापुरे (वय २४, रा. ब्रम्हतळे, आलमगीर, भिंगार) असे सांगितले. त्याची जिल्हा शासकीय रूग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, त्याने गांजा ओढला असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. पोलिस अंमलदार अतुल काजळे यांच्या फिर्यादीवरून अविनाश नागापुरे याच्याविरूद्ध अंमली पदार्थ आणि नशा आणणारे पदार्थ प्रतिबंध कायदा (एनडीपीए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोतवाली हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा
Nagar Reporter
अहमदनगर :
शहरातील टिळक रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की, टिळक रस्त्यावरील कानडे वॉशिंग सेंटरच्या आडोशाला मटका जुगार खेळविला जात आहे. यादव यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, सागर मिसाळ, सोमनाथ राऊत, कैलास शिरसाठ यांच्या पथकाने ता.३ रोजी सायंकाळी साडे सात वाजता छापा टाकला. या ठिकाणी आरोपी सद्दाम सिकंदर खान (वय ३२, रा. बँक कॉलनी, केडगाव) हा मटका आणि जुगार खेळवित असल्याचे आढळून आले. त्याच्या अंगझडतीत एक हजार २० रूपये आणि जुगाराचे साहित्य आढळून आले. पोलिस अंमलदार सागर मिसाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी सद्दाम खान याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटणारे अटक
Nagar Reporter
अहमदनगरः
जिल्ह्यातील विविध भागात गावठी पिस्तोलच्या आधारे लुटमार करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या टोळीने संगमनेर तालुक्यातील साकूर- मांडवे रस्त्यावरील पेट्रोलपंप लुटला होता. केडगाव उपनगरात ही एकाचा खून करून ऐवज लुटला होता.

जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर गेल्या काही दिवसांमध्ये लुटीच्या घटना वाढल्या होत्या. लुटारू हे गावठी पिस्तोलचा धाक दाखवून लुटत होते. साकूर- मांडवे रस्त्यावरील पेट्रोलपंप ता. २६ फेब्रुवारी रोजी लुटण्यात आला होता. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी (दि.४) या टोळीला जेरबंद केले.

पोलिसात तक्रार देणाऱ्या महिलेचा विनयभंग
अहमदनगर : पोलिसात तक्रार देणाऱ्या महिलेचा विनयभंग करून धमकावण्यात आले. सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील एका उपनगरात शुक्रवारी (दि.३) रात्री आठ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी सुरज नंदकुमार औटी (रा. सहकारनगर, पाईपलाईन रस्ता) याच्याविरूद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज औटी यांचे मालमत्ताच्या कारणातून सावेडीतील पाईपलाईन रस्त्यावरील एका कुटुंबाशी वाद आहेत. सुरज आणि त्याची आई शोभा यांना या कुटुंबातील एका वृद्ध महिलेला सायंकाळी सव्वा पाच वाजता धमकावले होते. या वृद्ध महिलेने सुनेसह तोफखाना पोलिस ठाण्यात याबाबत अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. तोफखाना पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याची माहिती सुरज याला मिळाली. त्यावर तो पुन्हा या कुटुंबाच्या घरी रात्री आठ वाजता आला. त्याने महिलेला धमकावले. ‘पोलिस ठाण्यात तक्रार का दिली,’ असे म्हणून धमकावले तसेच जीव मारण्‍याची धमकी दिली. या महिलेशी गैरवर्तन केले. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सुरज औटी याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा
अहमदनगर ः शहरातील नवीपेठ भागात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद शिवराम गंगेकर (वय ५२, रा.बेलदार गल्ली, सर्जेपुरा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
कोतवाली पोलिसांचे पथक शुक्रवारी (ता.३) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नवीपेठ भागात गस्त घातल होते. त्यावेळेस नवीपेठ भागात शहर बँकेशेजारी महिंद्रा जितो (एमएम १६ सीसी ३५९३) वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने उभी केली होती. पोलिस अंमलदार श्रीकांत दीपक खताडे (वय ३६) यांच्या फिर्यादीवरून वाहन चालक विनोद गंगेकर याच्याविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वेच्या धडकेने युवक ठार
अहमदनगर : रेल्वेच्या धडकेने युवक जागीच ठार झाल्याची घटना अरणगाव (ता.नगर) शिवारात व्ही.आर,डी.ई. प्रवेशद्वाराजवळ शनिवारी (दि.४) सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली. नीलेश नामदेव दातरंगे (वय ३५, रा. दातरंगे मळा, नालेगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.
रेल्वेच्या धडकेने तरूणाचा मृत्यू झाल्याची माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणला. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या कुटुंबीयांकडे मृतदेह सुपूर्द करण्यात आला.

कामगाराची आत्महत्या
अहमदनगर : भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. अवधूत पांडुरंग एडके (वय ३३, रा. साठेनगर, ता. मुदखेड, ता. नांदेड) मृत कामगाराचे नाव आहे.
एडके हा विळद घाट (ता.नगर) येथील एका ठेकेदाराकडे काम करत होता. तो विळद गावातील पाण्याची टाकी भागात भाड्याची खोली घेऊन राहत होता. त्याने या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्याच्या ही बाब शुक्रवारी (ता. ३) सकाळी लक्षात आल्यावर त्यांनी ही माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!