👉त्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्याची चर्मकार विकास संघाची मागणी
👉तपासाची माहिती मागितल्याने पोलीस निरीक्षक कुटुंबीयांनाच हाकलून लावत असल्याचा आरोप
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर – अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन, दीड महिने उलटून देखील तपास लागत नाही. कुटुंब विचारणा करण्यासाठी गेले असता, पोलीस निरीक्षक कुटुंबीयांनाच दमदाटी केली जाते, या संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांची चौकशी करून निलंबन करावे, व अल्पवयीन मुलीचा तपास लावण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. यावेळी प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, अनिल ठवाळ, मोहन पवार आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा येथील एका गावात राहणार्या हातावर पोट असलेल्या चर्मकार समाजातील शालेय विद्यार्थिनी बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबीयांनी दि.२९ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन तब्बल ५० दिवस झाले असून, पोलीस निरीक्षकांनी कर्तव्यात कसूर केल्याने सदर मुलीचा तपास लागलेला नाही. बेपत्ता अल्पवयीन मुलीचे वडील व कुटुंबातील सदस्य पोलीस निरीक्षक यांच्याकडे चौकशीसाठी वेळोवेळी विनवणी करीत होते. परंतु पोलीस निरीक्षक यांनी संबंधित कुटुंबाला धमकावून हाकलून लावले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
बेपत्ता मुलगी सापडत नाही म्हणून, मुलीच्या कुटुंबीयांनी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आरोपी व आरोपींना मदत करणार्या लोकांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. मात्र आजपर्यंत बेपत्ता मुलीचा शोध लागलेला नसून, आरोपी मोकाट फिरत आहे. या घटनेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. पोलीस निरीक्षक आपल्या कर्तव्यात कसूर करुन बेपत्ता मुलीचा शोध लावण्यासाठी कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही. श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात जनसामान्यांच्या अनेक तक्रारी असून, त्यांच्या कामकाजाला नागरिक त्रस्त झालेली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध दोन दिवसात लावण्याची मागणी करुन, आरोपींवर कारवाई न झाल्यास संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.