संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : ११२ डायल करुन घटनेची माहिती देताच पोलिस यंत्रणेने सर्तकतेने तपास सुरू केला. या दरम्यान साडे तीन वर्षाच्या बाळाचे अपहरण करणा-या आरोपीस ३ तासात पकडून बाळाला आईकडे सुखरुप सोपविण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर ग्रामीण डिवायएसपी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोसई गायकवाड, पोहेकॉ सांगळे, पोना मिसाळ, पोकॉ सानप, पोकॉ देशमुख, पोकाॅ शिंदे, मपोकॉ पठाडे व मोबाईल सेलचे पोकॉ राहुल गुंड व पोशि नितीन शिंदे आदिंच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. १६ जुलै २०२३ रोजी दुपारी २. १५ वाजण्याच्या सुमारास चेतना कॉलनी येथील रहीवासी हे दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास भाडोत्री खोली बघण्याकरीता गेले होते. यावेळी त्यांच्याबरोबर साडेतीन वर्षांचा मुलगा प्रतिक हा होता. चेतना कॉलनी येथे भाडोत्री रुम पाहत असताना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर उभा होता. रुम पाहुन खाली आल्यावर त्यांना त्यांचा मुलगा हा रस्त्यावर दिसला नाही. त्यांनी आजुबाजूला पाहिले, पण त्यांना मुलगा प्रतिक कोठेच मिळून आला नाही. त्यांनी आजुबाजूला विचारले की येथे लहान मुलगा पाहिला का? तेव्हा तेथील लोकांनी त्यांना सांगितले की आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक ३०-३२ वर्षाच्या एकाजणाने त्याला त्याच्याबरोबर घेऊन गेला. तेव्हा त्यांची खात्री झाली की, मुलास कोणीतरी पळवून नेले आहे, त्यांनी लगेच डायल ११२ यावर फोन करुन मुलगा प्रतिक यास एक अनोळखीने घेऊन गेला आहे, असे सांगितल्यावर घटनेचा फोन कंट्रोलवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्राप्त होताच, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि सानप यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ताबडतोप घटना ठिकाणी जाऊन भेट दिली. त्यांनी, तात्काळ एक पथक तयार करुन पथकातील कर्मचारी यांनी घटनेबाबत तात्काळ माहिती घेतली असता त्यांना मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परिसरात एकजण एका लहान मुलासह संशयीतरीत्या फिरत असल्याचे माहिती मिळाली. त्या ठिकाणी तात्काळ पोहचून मेहकरी गावचे बस स्टॅन्ड परिसरात शोध घेतला असता तेथे एकजण हा त्याच्यासोबत असलेला मुलगा पथकातील कर्मचारी यांना दिसला. लगेच त्यांना तो दाखवला असता तो लहान मुलगा ओळखला, की हा त्यांचाच मुलगा प्रतिक आहे. त्यावेळी त्याला घेऊन फिरणाऱ्या संशयीतास ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र बबन थोरात (रा. शेवगाव) असे असल्याचे सांगितले. त्यास मुलाबाबत अधिक विचारपुस केली असता त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने त्यास ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. यावेळी देण्यात आलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गु.र.नं ६२३ / २०२३ भादवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.