संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- सुप्रसिद्ध पार्श्र्वगायक सुदेश भोसले यांनी सादर केलेली ठेका धरायला लावणारी गाणी, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सादर केलेले बहारदार नृत्य, पांडू फेम पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे, सुर नवा ध्यास नवा फेम महागायिका सन्मिता शिंदे, झी सा रे ग म फेम गायिका श्रावणी महाजन, लिटिल चॅम्प ज्ञानेश्वरी घाडगे या कलावंतांनी सादर केलेल्या जुन्या, नव्या, मराठी, हिंदी, नृत्य, संगीत अविष्काराने नटलेला रसिक ग्रुपचा २१ वा रसिकोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा गुढीपाडवा सांस्कृतिक सोहळा हजारो रसिकांच्या साक्षीने मोठ्या जल्लोषात पार पडला.
मध्यंतरानंतर झालेल्या सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या गायनाने तमाम अबाल वृद्ध रसिकांना नृत्याचा ठेका धरायला भाग पाडले. प्रिया ओगले यांच्या ‘नृत्यझंकार ग्रुपने सादर केलेल्या गणेश वंदनेने रसिकोत्सव कार्यक्रमास प्रारंभ झाला. लिटिल चॅम्प फेम बाल गायिका ज्ञानेश्वरी घाडगे हिने ‘माझे माहेर पंढरी’ हा अभंग व महागायिका सन्मिता शिंदे यांनी सादर केलेल्या विठ्ठल नामाचा गजर करणाऱ्या ‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’ l या अवित गोडीच्या अभंगाने रसिक प्रेक्षक भक्ति रसात न्हाहून निघाले.
त्यानंतर पांडू फेम पार्श्वगायिका अबोली गिऱ्हे हिने ‘कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी’ ही अफलातून गवळण सादर केली. मन्वर यांनी सादर केलेल्या ‘मेरे रश्के कमर, तुने पहिली नजर’ या कव्वाली ने धमाल उडून दिली. झी सारेगमप फेम पार्श्वगायिका श्रावणी महाजन यांनी सादर केलेल्या ‘दमा दम मस्त कलंदर’ या सुफी गीत संगीताने रसिकांमध्ये ऊर्जा निर्माण केली. सुर नवा ध्यास नवा फेम पार्श्वगायक रवींद्र खोमणे यांनी ‘आली ठुमकत, नार लचकत, मान मुरडत, हिरव्या रानी’ ही पुरुष प्रधान लावणी सादर केली. त्यानंतर श्रावणी महाजन व रवींद्र खोमणे यांनी ‘प्रिये, जगु कसा, तुझ्याविना मी राणी गं’ हे रोमँटिक युगलगीत सादर केले.
उत्तरार्धात सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या अपनी तो जैसे तैसे, थोडी ऐसे या वेसे या गाजलेल्या धमाकेदार गीताने स्टेजवर एन्ट्री घेतली. आणि स्टेजवरून ते थेट रसिकांच्या अलोट गर्दीत जाऊन त्यांनी एक हसीना थी एक दीवाना था, मेरे मेहबूब कयामत होगी, ये जो मोहब्बत है, इंतहा हो गई, देखा ना हाय रे, सोचा ना हाय रे, जहा तेरी नजर है, अरे दिवानो, मुझे पहचानो, जुम्मा चुम्मा दे दे, दे दे प्यार दे, छोरा गंगा किनारे वाला, यमला, पगला, दिवाना, मै हु डॉन, देखा जो तुझे यार दिल में बजी गिटार, लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता, माय नेम इज लखन, काला कौवा काट खाएगा, रामजी की निकली सवारी, भोले ओ भोले, अश्विनी ये ना, कभी अलविदा ना कहना अशी सदाबहार गाणी किशोर कुमार, अमिताभ बच्चन, व राजेश खन्ना स्टाईल मध्ये सादर केली.
या एनर्जेटिक गाण्याबरोबरच त्यांनी शराबी या चित्रपटातील अमिताभ बच्चन, मुक्री, ओमप्रकाश यांच्या हुबेहूब आवाजातील डायलॉग व शेरोशायरी पेश करून या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने चार चांद लावले. या सर्व गायक कलावंतांना संदीप मस्के (ढोलक), प्रवीण कोंडेकर (ढोलकी), लक्ष्मी कुडाळकर (ढोलकी), सोमनाथ फाटके (ऑक्टोपॅड), विजय मोंडे (कोंगो बोंगो), रशीद शेख (सिंथेसायजर), अंजन घोष (गिटार) यांनी सुरेख संगीत साथ केली. सुप्रसिद्ध निवेदक संदीप पाटील आणि अहमदनगरचे उद्धव काळापहाड यांनी या कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन केले.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे, महापौर रोहिणी शेंडगे, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, मसाप पुणे चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महिला बाल कल्याण समतीच्या सभापती पुष्पाताई बोरुडे, नगरसेविका आशाताई कराळे, उद्योजक अश्विन गांधी, सुभाष कायगावकर, राजेश भंडारी, संतोष बोथरा, सुनील मुनोत, गौतम मुनोत, कायनेटिकचे सर व्यवस्थापक शशिकांत गुळवे, डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. प्रकाश कांकरिया, विजय इंगळे उद्योजक श्रीहरी टिपुगडे, अक्षय वाघमोडे, कारभारी भिंगारे, मकरंद कुलकर्णी, सन फार्माचे सर व्यवस्थापक हरीश बऱ्हाटे, बाळासाहेब विश्वासराव आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे शानदार उद्घाटन झाले. मध्यंतरानंतर अहमदनगर शहराचे लाडके आ. संग्राम भैय्या जगताप यांची जोरदार एन्ट्री झाली. त्यांच्या हस्ते उपस्थित सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी डॉ बी. जी. शेखर पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सलिमाठ, मनपा आयुक्त पंकज जावळे, मसाप पुणे चे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. संतोष बोथरा यांनी आभार मानले.
विनायक वराडे, हनीफ शेख, भास्करराव गायकवाड, प्रशांत देशपांडे, श्रीकृष्ण बारटक्के, राहुल पाटोळे, सुदर्शन कुलकर्णी, समीर पाठक, प्रसन्न एखे, निखिल डफळ, उत्कर्ष अंचवले, तेजस अतितकर, संकेत होशिंग, विनिता गुंदेचा, शैलेश थोरात, बालकृष्ण गोटी पामुल, मीनाक्षी पाटील, प्रशांत अंतपेल्लू, ऋषिकेश येलुलकर, कुणाल अंतपेल्लू, स्नेहल उपाध्ये, दिपाली देऊतकर, बाळासाहेब नरसाळे, कार्तिक नायर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.