कुटूंबात आनंदी वातावरण असेल तर कुटूंबे सुखी होतील : ओमप्रकाश दरक
Nagar Reporter
Online news
भिंगार : जीवनात आनंदाने जगण्याकरिता उत्तम आरोग्यपुर्ण जगणे आवश्यक असून नित्यनियमाने व्यायाम केल्यास मन व शरीर दोन्हीही आनंदी राहण्यास मदत होते. कुटूंबात सात्विक माया असणे तसेच परिवारात अंतर्गत आनंदी वातावरण कसे आसावे याबाबत मार्मिक निवेदन करत जीवन जगण्याचे शास्र जर समजले तर जगण्यात निश्चित आनंद वाटतो असे प्रतिपादन सोलापूर येथील ओमप्रकाश दरक यांनी स्वामी विवेकानंद जनकल्याण ट्रस्ट आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना केले.
व्याख्यानमालेचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद मुळे यांनी तर व्याख्याते ओमप्रकाश दरक यांचा परिचय रविंद्र जाजू यांनी करून दिला.
मनुष्याच्या जीवनाच्या शिशु, बालक, किशोर, तरूण, प्रौढ, वृद्ध अशा अवस्था असून त्यांच्या प्रत्येक अवस्थेच्या गरजा वेगवेगळ्या आहेत.शिशु अवस्थेला प्रेम व स्नेह, बालक अवस्थेच्या शरीर मन,बुद्धीला सम्यक अवस्था प्राप्त करून देणारा संस्कार, किशोर अवस्थेला संरक्षणाची , तरूण अवस्थेला मर्यादित स्वातंत्र्य व प्रौढ अवस्थेत सन्मान आणि वृद्ध अवस्थेत जर सेवा झाली तर निश्चितच पारिवारीक आनंद प्राप्त होत असतो.हा सुखी व आनंदी जीवन जगण्याचा अत्यंत सुटसुटीत मार्ग असून या मार्गावर चालल्यास प्रत्येक कुटूंबात निश्चितच आनंदी वातावरण तयार होऊन कुटूंबे सुखी होतील असे शेवटी त्यांनी विषय विवेचन करताना सांगितले.
ओंकार संगीतालयाच्यावतीने सुस्वर स्वागतगीत गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी मंचावर संस्थेचे कार्याध्यक्ष शिवप्रसाद काळे व संस्थेचे उपाध्यक्ष रूपेश भंडारी उपस्थित होते.व्याख्यानाचे सूत्रसंचालन तर आभार गोरक्ष वामन यांनी व्यक्त केले. ही व्याख्यान माला तीन दिवस चालणार आहे. यावेळी मोठया संख्येने श्रोते उपस्थित होते.