भाग-२
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होतांना किंवा आपण कोणत्या क्षेत्रात कार्य करावयाचे हे ठरवण्याच्या आधी, आपण स्वतःला जाणून घेणे गरजेचे असते. आपल्याला आपली स्वतःची माहिती, क्षमता नसतांना एखादा व्यवसाय किंवा क्षेत्र निवडणे धोक्याचे ठरते.
आपण नोकरी करावी का? व्यवसाय करावा ? किंवा एखादे व्यावसायिक प्रोफेशन निवडावे? हे ठरविण्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या व्यक्तीमत्वामधे असणाऱ्या चांगले गुण-दोष अथवा कमतरता यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण बऱ्याच वेळा व्यक्तीला त्याच्या जवळ असलेल्या चांगल्या गुणांची माहीतीच नसते. अशा चांगल्या गुणांचा (Stregth) वापर आपण यशस्वीतेसाठी करु शकतो. एखाद्या वेळी इतरांनी आपले दोष आपल्या निदर्शनास आणलेले ही आपल्याला आवडत नाही त्यामुळे आपले व्यक्तीमत्व विकसीत होऊ शकत नाही.
आपण आपल्या चांगल्या गुणांचा वापर करुन व दोष कमी केल्यास आपणही आपल्या निवडलेल्या क्षेत्रात निश्चित यशस्वी होऊ शकतो. आपण आपल्याला काय करावयाचे हे ठरवतांना आपल्यामधील क्षमतांचा अंदाज घेवून काय करावयाचे हे प्रथम ठरवावे. ते कसे? आपण पाहू या…!
१. प्रथम कोणाच्या सांगण्यावरुन आपणास काय करावयाचे हे ठरवू नये.
२. घरच्यांच्या अथवा पालकांच्या दबावाखाली आपण आपले क्षेत्र किंवा काय करावयाचे हे ठरवू नये कारण बऱ्याच वेळा स्वतःमधे निर्णय क्षमता नसल्यास असे घडते.
३. काही वेळा इतरांच्या यशाकडे बघून आपण ते क्षेत्र निवडतो असे करु नये. (उदा.- एखादा मित्र पीएसआय परिक्षा पास होऊन झाला म्हणजे आपणही होऊ असे नाही, आपण आपल्या मधील असणाऱ्या क्षमतांचा अभ्यास करुनच मग ठरवावे.)
४. आपण आपणास काय करावयाचे हे ठरवतांना आपल्या व्यक्तीमत्वाचा अभ्यास करणे गरजेचे आहे म्हणजेच शिक्षण, आर्थिक परिस्थिती, अनुभव, माझी आवड व आपले आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.
स्वतःला ओळखणे म्हणजे आपण भुतकाळात काय केले? सध्या वर्तमान काळात काय करत आहोत? व भविष्यात आपल्या काय योजना आहेत? याचा आढावा घेतल्यास आपल्याला काय करावयाचे हे निश्चित होऊ शकते यालाच आत्मपरिक्षण (SWOT Analysis) असे म्हणतात. जेणे करुन आपल्याला आपला मूळ स्थायीभाव प्रेरणा (Basic Motivation) कळू शकेल. प्रामुख्याने व्यक्तीमध्ये प्रमुख तीन प्रेरणा आढळतात. १) सिध्दी प्रेरणा २) विस्तार प्रेरणा ३) सत्ता प्रेरणा.
प्रत्येक व्यक्तीत सदरील प्रेरणा वेगवेगळ्या प्रमाणात असतात. ज्या प्रेरणेचे प्रमाण जास्त, त्या प्रकारचे आपले व्यक्तीमत्व त्या प्रेरणेचे प्रभारीत असते. (उदा.- कोणत्याही क्षेत्रात यशस्वीतेसाठी सिध्दी प्रेरणा अथवा अभिप्रेरणा आपल्या व्यक्तीमत्वात वाढवावी लागेल व हे योग्य त्या प्रशिक्षणाद्वारे शक्य आहे.)
■ इच्छाशक्ती अंगी हवीच !
भूक ही माणसाची जन्मतजात प्रवृत्ती आहे. वस्तुतः तीच जीवनाला चालना देणारी शक्ती आहे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मिळवण्याची इच्छाशक्ती असलीच पाहिजे. कारण ही सामान्य इच्छाच सवोच्च ध्येयाच्या आकांक्षेत परिवर्तित होऊ शकते. आकांक्षाहीन माणूस समाजाला धोकादायक व भार ठरु शकतो. स्वतःच्या उन्नतीसाठी सदैव कशा ना कशासाठी तरी धडपडलं पाहिजे. एखाद्या महत्त्वाकांक्षा इतरांना कितीही क्षुल्लक वाटो, त्यासाठी तो माणूस मात्र आकाशपाताळ एक करतो. संपत्ती, सत्ता, प्रतिष्ठा नि अशाच इतरही गोष्टींच्यामागे लोक धावत असतात. या त्यांनी प्रयत्न करावेत, कारण अशा प्रयत्नांमधूनच ते अधिक उच्च ध्येयाकडे जाऊ शकतील. ही प्रक्रिया नैसर्गिक असल्यानं ती घडणं अपरिहार्य आहे. अशा प्रकारे इच्छा हा स्वतःच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणास्त्रोत आहे. इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करणे कारण ध्येयहीन माणूस म्हणजे समाजाला मिळालेला शापच ! ध्येय लौकिक असो वा पारलौकिक : स्वतः त्यासाठी झपाटून प्रयत्न केलेच पाहिजेत. कारण, या प्रयत्नांमधूनच त्याला काहीतरी साध्य होतं. उद्दिष्ट मोठं असो वा छोटं, ते गाठण्यासाठी आपल्या मधील असलेल्या गुणांचा वापर आणि परिश्रमांची आवश्यकता आहे.
व्यावसायिक यशस्वीता पूर्णतः जन्मजात अथवा अनुवंशिक गुणसंपदा नाही किंवा विशिष्ट जाती-जमाती, स्त्री-पुरुष, धार्मिक नाही अथवा घराणेशाही किंवा मक्तेदारी नाही.
व्यावसायिक यशस्वीता ही व्यक्तीमध्ये ध्येय गाठण्याची, प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतःला सिध्द करण्याची व इतरांपेक्षा वेगळे सिध्द करण्याची ही नाविन्यपुर्ण कृती करण्याची प्रवृत्ती होय. ह्यासाठी आवश्यक असणारी गुणसंपदा आपण पाहू या…!
👉 मर्यादीत धोका पत्करणे.
👉 स्वतंत्र बुध्दी
👉बदलण्याची व जबाबदारी पेलवण्याची वृत्ती निर्णय क्षमता
👉अडचणीत न डगमगता मार्ग काढण्याची तयारी.
👉 भविष्याबद्दल आशादायी दृष्टीकोन
👉 दुरदृष्टी व संघटन कौशल्य
👉आव्हान स्विकारण्याची तयारी
👉प्रचंड उत्साह व स्वतःबद्दल सकारात्मकता
👉 व्यावसायिक यशस्वीतेसाठी स्पर्धेची तयारी.
स्वयंविकासासाठी महत्त्वाच्या टिप्स :
१. पहिली गोष्ट म्हणजे आपलं व्यक्तिमत्व सर्वांना आवडेल अशा प्रकारचं बनवा.
२. ‘स्व’ म्हणजे स्वतःला ओळखा ! आपल्यामधील असलेल्या चांगले कलागुणांना व वाईट सवयींना जाणा.
३. आपल्या चांगल्या गुणांचा वापर आपल्या व्यवसायिकतेमधे पुरेपुर करा.
४. आपल्यातील असणाऱ्या वाईट सवयी व कमजोर बाजू शोधणे व ते कमी करण्यासाठी प्रयत्न करा.
५. सकारात्मक दृष्टीकोन व हास्यमय गोष्टी अंगी बाळगा.
६. चांगले शारिरीक आरोग्य हे सुखी जीवनाचे व व्यवसायाचे रहस्य असून त्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही.
७. तुमचं व्यक्तिमत्व रिकामा असेल तर तुम्ही इतरांवर कधीच प्रभाव टाकू शकत नाही.
८. एखादी गोष्ट करायची इच्छा तुमच्या चेहऱ्यावर वाचता आलो पाहिजे. ९. एकदा का तुम्हाला उद्देश गवसाला की, त्यासाठी लागणारी कौशल्ये आपोआप चालत येतील.
१०. आपले निश्चित ध्येयानुसार क्रिया करणे म्हणजे आपण तिथपर्यंत पोहोचू शकू.
११. आपल्या स्वःविकासाचा किंवा व्यवसायाचा दैनंदिन कृती आराखडा तयार करा.
१२. कुठल्याही नवीन गोष्टीकडे आव्हानात्मक दृष्टीने पहा. घाबरु नका. धैर्याने सामारे जा. काही काळ वाट पहावी लागली तरी जरुर पहा.
१३. आपल्यातील चालू घडामोडींचा अभ्यास करणे व गुण-दोष जाणून पुढील वर्तमान व भविष्यकाळाचा आढावा घेणे.

जो व्यक्ती स्वतःला व स्वतःच्या शक्तीला ओळखतो, तो जीवनात सर्व काही प्राप्त करु शकतो. आपण समजतो, त्यापेक्षा किती तरी पटीने आपल्यात सुप्तशक्तीचा प्रचंड साठा असतो. जो स्वतःला ओळखू शकत नाही, तो जगला कसे ओळखू शकेल…? त्यामुळे प्रथम स्वतःला ओळखणे आवश्यक आहे. आत्मउन्नतीचा, प्रगतीचा व ध्येयपूर्तीचा तो हमखास यशोमहामार्ग आहे.
आपल्या कल्पनाशक्ती पेक्षा ही अफाट सुप्तशक्ती आपल्या सर्वामध्ये आहे. अनेक व्यक्तींमध्ये गुणवत्ता असते, उंच विचारांची ध्येय असतात. केवळ आपले सुप्त सामर्थ्य न ओळखू शकल्यास ते वाया जाते. कुठलीही कामगिरी घडवून आणण्यासाठी व्यक्तीला काही प्रेरणा लागते. अशी प्रेरणा, ताकद, विचारशक्ती आणि व्यावसायिक व्यक्तिमत्व विकासातील गुणांचा वापर करुनच यशस्वी उद्योजक घडत असतो, कारण त्याला फक्त यशाची स्वप्नेच दिसतात, त्यासाठी तो सदैव यशासाठी मार्गक्रमण करीत असतो.
विज्ञान व तंत्रज्ञानामुळे स्वतःला ओळखण्याची विविध तंत्र उपलब्ध आहेत. तीळा-तीळा दार उघड… या म्हणी प्रमाणे आपल्याला आपल्या व्यक्तीमत्वात असणाऱ्या विविध गुणसंपदेची माहीती करुन घेणे व आत्मपरिक्षण करण्याची आपल्यात बदलण्याची खरी गरज आहे. ■ ‘स्व’ बदल कशासाठी हवा?
आपण आज माहिती युगात वावरत आहोत. मोबाईल, संगणक यांच्या सारख्या गोष्टीही आता चैन राहिलेली नाही, जग बदलते आहे, परंतु हे बदलत असताना आपण कितपत बदलतो आहोत, याचा विचार करायला हवा. यश आणि बदल यांचा परस्परसंबंध आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वात बदल घडवून मला यश मिळत असेल, तर बदल आवश्यक आहे आणि म्हणूनच यश आणि बदल यांची सांगड आवश्यक आहे. बदल न स्वीकारण्याची काही कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात.
📥 माहिती नसणे : उदा. उत्कृष्ट आणि यशस्वी उद्योजक व्हायचं असेल, तर त्यासाठी लागणारी उद्योजकीय गुणसंपदाची आवश्यकता असते. पण हे माहितीच नसेल तर?
📥योग्य ते कौशल्य नसणे : इंग्रजी ही नॉलेज लँग्वेज आहे. इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नसेल, तर कदाचित चांगली नोकरी मिळण्यात किंवा व्यवसायात निश्चितच अडचणी येऊ शकतात.
साधनसामग्रीची कमतरता : बदलण्यासाठी आवश्यक ती सामनसामग्री नसणे.
📥 पाठिंबा नसणे : कधी कधी या सर्व गोष्टी करण्यासाठी पुरेसे पाठबळही कमी पडते.
📥उद्दिष्ट : आयुष्यात नेमके काय कमवायचे आहे, हेच माहित नसणे किंवा नेमके उद्दिष्टच नसणे. • रिस्क न घेण्याची प्रवृत्ती : मनात असणारी अपयशाची (आणि यशाचीही-मी खरंच मोठा झालो, तर हे करु शकेन का? ही प्रवृत्ती) भीती.
📥 एवढ्या लोकांसमोर प्रेझेन्टेशन कसं देणार? नको रे बाबा. इत्यादी वरील गोष्टींवर नजर टाकल्यावर असे लक्षात येईल की, बदल न स्वीकारण्यामागे मानसिक कारणे जास्त आहेत, आणि त्याचबरोबर आपण आपल्यात असणाऱ्या क्षमतांना (Potential) ओळखलेले नसते. बदल पचनी पाडणे फारच कठीण असे नाही.
जोपर्यंत बदलण्याची गरज जाणवत नाही, तोपर्यंत आपण बदलाला विरोध करतो. चांगली नोकरी मिळण्यासाठी माझे संप्रेरण कौशल्य (Com- munication skill) वाढवणे मला आवश्यक आहे. हे जोपर्यंत मला कळणार नाही अथवा त्याची गरज मला जाणवणार नाही, तोपर्यंत मी बदलण्याचा प्रयत्न करणार नाही. हे सर्व करण्यासाठी इच्छा हवी. एकदा बदलण्याची गरज आणि इच्छा असली, की मग ते बदल आत्मसात करण्यासाठी मला काय करावे लागेल, हा झाला ज्ञानाचा भाग. नंतर जे काही साध्य करायचे आहे, ते साध्य करण्यासाठी तयारी आली. हे सर्व केले आणि मी बदललो, तर त्याची फळे मला निश्चितच मिळतील. या भावनेने बदल स्वीकारण्याची ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
एखाद्या लहान मुलाचे वर्तन सुधारायचे असेल (थोडक्यात त्याला बदलायचे असेल) तर आपण काय करतो. मुले कोठे चुकतात, हे सर्वप्रथम माहिती होणे आवश्यक असते. चुकीच्या वागण्याचे तोटे कोणते, हे मुलाला समजावल्यावर त्याच्यात बदलण्याची इच्छा निर्माण होते (Desire). मग योग्य वर्तणूक कोणती आहे, हे मुलाला समजणे गरजेचे आहे. हे समजल्यावर योग्य वागण्याची आणि नवीन पध्दतीने वागण्याची त्याला सवय करावी लागेल. हे सर्व स्वीकारण्याची तेवढी त्याची कुवत हवी. एकदा बदल स्वीकारल्यानंतर मला फायदा झाला, ही जाणीव त्याला व्हायला हवी. (Reintercement) सतत चांगली वर्तणूक राहावी, यासाठी त्याला काहीतरी फायदा दिसायला हवा.
वैयक्तिक आयुष्यात जेव्हा आपण स्वतःला बदलण्याचे ठरवतो, त्यामागे वरील प्रक्रियेतून आपण जात असतो. नवीन भाषा शिकण्यापासून एखादे नवीन कौशल्य आत्मसात करण्यापर्यंत किंवा आपले प्रभावी यशस्वी व्यक्तिमत्व घडविण्याची किमया असो आपण या पायऱ्यांचाच उपयोग करत असतो. त्यामुळे बदल हा सृष्टीचा नियम असूनही आपण त्याला विरोध का करतो, हे मोठे आश्चर्यच आहे.
स्वतःचे आत्मपरिक्षण, स्वतःला ओळखणे म्हणजे स्वःसामर्थ्याची खरी ओळख…! आपले जीवनाचा स्तर उंचवायचा असेल, तर छोट्याशाही आकांक्षेच्या पूर्तीसाठी त्यानं अथक प्रयत्न केले पाहिजेत. प्रयत्न हीच प्रगतीची पहिली पायरी आहे.
◼️कारण प्रगतीचे मूळ आत्मपरिक्षणातच आहे.
स्वयंविकासासाठी लागणारे शारीरिक, मानसिक, बौध्दिक व संघटन बळ हे चार प्रकारचे बळ आपल्यामध्येच आहे, ते जाणून घ्या,
⚡⚡⚡☔☔☔
आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच ! जसे घडवू…तसे घडेल !
कुठल्याही क्षेत्रात सातत्याने घडणारी गोष्ट म्हणजे बदल. आपण या बदलाला सामोरे जायलाच हवे. ‘न बदलाल तर अपयशी होताल’ ही गोष्टही तेवढीच खरी आहे.