सैन्यदलाचा नवीन बनावट गणवेश विक्री करणारा अटक ; भिंगार कॅम्प पोलीस व पुणे दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्सची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भारतीय सैन्य दलाचा नवीन कॉम्बॅट बनावट गणवेश तयार करुन त्याची खुल्या बाजारात विक्री करणारा नाशिक येथील एकास पकडले आहे. ही कारवाई भिंगार कॅम्प पोलीस व दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्स, पुणे यांनी संयुक्त केली आहे. सुरेश प्रितमदास खत्री (वय ४९, रा. गंगा निवास, आनंद रोड, देवळाली कॅम्प, जि. नाशिक) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्स, पुणे यांना माहिती मिळाली की, सीएसडी कॅन्टीन, जामखेड रोड, अहमदनगर येथे इसम सुरेश खत्री हा इनोव्हा कार क्रमांक (एमएच १५ डीएल ७११७) मध्ये येऊन विनापरवाना नवीन प्रकारचा कॉम्बेट बनावट आर्मी युनिफॉर्मची (गणवेशाची) विक्री करतो, आता गेल्यास मिळून येईल. ही खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने ती माहिती अहमदनगर एसपी राकेश ओला यांना कळविली. याबाब अहमदनगर जिल्हा तसेच लगतचा औरंगाबाद व पुणे जिल्हा सैन्य दलाचे दृष्टीने अतिशय महत्वाचे व संवेदनशील ठिकाणे असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील बनावट युनिफॉर्मचा वापर करुन संबंधित सैन्य विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन अनुचित प्रकार किंवा घातपात करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
या घटनेचे गांभिर्य लक्षात घेऊन एसपी श्री ओला यांनी भिंगार कॅम्प पोलीस व दक्षिण कमान मिलेट्री इंन्टेलिजेन्सचे अधिकारी व पंचाना बरोबर घेऊन माहिती ठिकाणी जाऊन संशयीताची खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले.
पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दि.२ फेब्रुवारी २०२४ रोजी सीएसडी कॅन्टीन,जामखेड रोड, अहमदनगर येथे जाऊन पाहाणी केली असता एकजण इनोव्हाकारजवळ उभा असलेला दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटलयाने पथकाने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या संशयीतास पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव सुरेश प्रितमदास खत्री (वय ४९, रा. गंगा निवास, आनंद रोड, देवळाली कॅम्प, जि. नाशिक) असे सांगितले. त्याच्या ताब्यातील इनोव्हा कारची पंचासमक्ष झडती घेता त्या कारमध्ये सैन दलाचे ४० युनिफॉर्म मिळून आल्याने त्या यूनिफार्मबाबत अधिक विचारपुस करता त्याने सैन दलातील अधिका-यांचे नवीन कॉम्बॅट युनिफॉर्म विक्री करता आणल्याचे सांगितले. त्याच्याकडे सैन्यदलाचा युनिफॉर्म विक्री करण्याबाबतचा परवान्याची विचारणा केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. आरोपीस सैन्यदलाचे ४० बनावट नवीन कॉम्बैट युनिफॉर्म मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले, त्याच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं.९७/२०२४ भादविक १७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यता आला आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस करीत आहेत.
एसपी ओला यांचे जनतेला आवाहन
नवीदिल्ली व राजस्थान येथील सैन्य दलाचे बनावट नवीन कॉम्बॅक्ट युनिफॉर्म विक्री करणारी टोळी उघडकीस येण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारे कोणी बनावट सैन्याचे नवीन कॉम्बॅक्ट युनिफॉर्म अगर साहित्य विक्री करुन फसवणूक करत असल्यास भिंगार कॅम्प पोलीसांशी संपर्क करावा, असे आवाहन अहमदनगर एसपी राकेश ओला यांनी केले आहे.