संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर :- जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांच्या, कुटुंबीयांच्या अडचणी सोडविण्यावर भर द्यावा आणि त्यांना सहकार्य करावे असे प्रतिपादन, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज सशस्त्र सेना ध्वजदिन निधी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ प्रसंगी डॉ. भोसले बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले पुढे म्हणाले, प्रत्येक वर्षी संपूर्ण भारतात जवळजवळ सात हजारहून अधिक सैनिक सेवानिवृत्त होत असतात. त्यापैकी आठ हजार सैनिक महाराष्ट्रातील असतात निवृत्तीनंतर या माजी सैनिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते या परिस्थितीत सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाची जवाबदारी व त्यांचे पुनर्वसनाचे काम सैनिक कल्याण विभागाद्वारे केली जाते, त्यांना मदत होण्यासाठीच सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन हा कार्यक्रम राबविला जातो.
ध्वजदिन निधी 2020 संकलनासाठी शासनाकडून अहमदनगर जिल्हयाला 1 कोटी 84 लाख 98 हजार रुपये इतके उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. उकृष्ठ नियोजनामुळे त्यापैकी 1 कोटी 32 लाख 20 हजार रुपये निधी संकलित झाला असून 71 टक्के उद्दीष्ट पूर्ण झाले आहे. त्याबद्दल सर्व नागरिकांना, संस्थांना, शासकीय कार्यालयाच्या अधिकारी कर्मचा-यांना मी मनापासून धन्यवाद देतो. यावर्षाप्रमाणेच पुढील वर्षासाठी 2 कोटी रुपयाचा निधी संकलित करण्याचा संकल्प आपण करुया.निधी संकलनासाठी तालुका स्तरावर कार्यक्रम, मेळावे आयोजित करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. भोसले पुढे म्हणाले, भारतीय सेनेवर प्रेम असणारी आणि समाजाप्रती आपले काही देणे आहे या भावनेची जाण असणारे, शहीद मित्रमंडळाचे अध्यक्ष मोहन नरहरी नातू यांनी या वेळी जम्मू कशमिरमध्ये 1993 मध्ये ऑपरेशन रक्षक मोहिमेमध्ये शहीद झालेले जवान मच्छिंद्र दत्तात्रय लोंढे या शहीद जवानांच्या कुटूंबाला 1 लाख रुपयाची मदत दिली. त्याबद्दल श्री नातू यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे हे काम गौरवास्पद आहे. कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वांनी लस घेवून सुरक्षित होणे महत्वाचे आहे. संभाव्य तिस-या लाटेच्या धोका लक्षात घेवून आपले गावातील इतर नागरिकांना सुध्दा कोरोना लसीकरण करण्यासाठी आपण प्रवृत्त करा. यासाठी आपण एक संकल्प करा ज्यांनी लस घेतील नसेल त्यांना लस घेण्यासाठी आपण सांगावे. व प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
कार्यक्रमात माजी सैनिक पाल्यांनी दहावी व बारावी परिक्षेत, विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा प्रशिस्तीपत्र व रोख 10 हजार रुपयांचा धनादेश आणि माजी सैनिक विजय यमाजी कापसे यांचा मुलगा धनंजय यास आय आय टी गोहाटी येथे उच्च शिक्षणासाठी रुपये 25 हजाराचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते देण्यात आला. भारतीय सेनेचे सैनिक बाबासाहेब जानकु रुपनर हे जम्मू कशमिरमध्ये अतिरेक्यांनी केलेल्या चकमकीत त्यांच्या हाताला व पायाला गंभिर दुखापत होवून अपंगत्व आल्यामुळे त्यांना 1 लाख 50 हजार रुपये सानुग्रह राशीचा धनादेश तसेच बाबासाहेब रुपनर यांना सन्मानार्थ मिळालेला ताम्रपट यांचे वडील जानकू रुपनर यांचा प्रदान करण्यात आला. माजी सैनिक पाच महिला बचत गटांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत प्रत्येकी 3 लाख रुपये मदतीचा पहिला हप्त्यांचा धनादेश डॉ. भोसले यांच्या हस्ते महिला बचतगटाच्या प्रतिनिधींना देण्यात आला.
या कार्यक्रमामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित, पोलीस निरिक्षक धनशाम डांगे, सहायक नियोजन अधिकारी दत्तात्रय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजय वाकचौरे यांनी सशस्त्र ध्वजसेना दिनाबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा सैनिक कार्यालयाचे अंकुश हांडे यांनी आभार व्यक्त केले. श्री. अमोल बागुल यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केल.