सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ३९ तक्रारी प्राप्त; २८ तक्रारी निकाली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३९ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २८ तक्रारी आचारसंहिता विभागाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत.
उर्वरित ११ तक्रारींपैकी २ तक्रारी इतर जिल्ह्यांच्या असल्याने संबंधित जिल्ह्यांना वर्ग करण्याबरोबरच ९ तक्रारी विषयाशी संबंधित नसल्याने त्या निर्गत करण्यात आल्या. तक्रारींचा निपटारा करण्याचा वेळ सरासरी ३१ मिनिट व ३९ सेंकंदाचा असल्याची माहिती आचार संहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे.
निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघाच्या १५, अकोले १, पारनेर १, शेवगाव १, कोपरगाव १, राहुरी २, शिर्डी ४ व श्रीरामपूर मतदारसंघातील ३ तक्रारींचा समावेश आहे.
सजग नागरिकांना आचारसंहिता पालनासाठी सहकार्य करणारे सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲप हे कोणत्याही ॲपस्टोअरमधून करता येते. या ॲपद्वारे नागरिकांना आचारसंहिता भंगाबाबत तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे १०० मिनिटात चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते.
आचासंहितेच्या अंमलबजावणीसाठी पथके सज्ज
निवडणूक प्रशासनाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी आणि जिल्ह्यात निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय प्रत्येकी एक आणि जिल्हास्तरावर एक असे एकूण १३ आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. अहमदनगर आणि संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी ८ आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांद्वारे आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.
त्यासोबतच अहमदनगर आणि संगमनेर मतदारसंघात प्रत्येकी ८ आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ६ याप्रमाणे ७६ स्थीर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे मद्य आणि पैश्याच्या अवैध वाहतूकीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. अहमदनगर मतदारसंघात ६, संगमनेर ५ आणि इतर सर्व मतदारसंघात प्रत्येकी ३ याप्रमाणे ४१ व्हिडीओ सर्वेक्षण पथक राजकीय प्रचारावर लक्ष ठेवून आहे. या पथकाकडून खर्च समितीच्या संदर्भासाठी आवश्यक चित्रीकरण देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात एक व्हिडीओ अवलोकन पथक आहे.