संजय महाजन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : समाजातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन वाटचाल करणे, हा माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांचा स्वभाव आहे. त्यांच्या पुढाकारातून गेल्या २३ वर्षांपासून आयोजित केला जाणारा सामुदायिक विवाह सोहळा शिर्डीचे सामाजिक वैभव आहे. आजवर राज्यभरातील २ हजार जोडपी या माध्यमातून विवाहबद्ध झाली. साईबाबांची शिकवणूक आणि सामाजिक बांधिलकीचे हे प्रेरणादायी उदाहरण आहे, असे प्रतिपादन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले.
माजी नगराध्यक्ष कैलास कोते व त्यांच्या पत्नी सुमित्रा यांच्या पुढाकारातून आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात वधू-वरांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. या सोहळ्यात विविध जातीधर्माची ६१ जोडपी विवाहबद्ध झाली. महंत उद्धव महाराज मंडलीक, महंत काशिकानंद महाराज, महंत अरूणगिरी महाराज, अभय शेळके, विजय कोते, बाबासाहेब कोते, शिवाजी गोंदकर, सुधाकर शिंदे, रमेश गोंदकर, कमलाकर कोते, राजेंद्र चौधरी, ताराचंद कोते, नितीन कोते, सुजित गोंदकर, नितीन शेळके, गजानन शेर्वेकर यांच्यासह वऱ्हाडी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते म्हणाले, की, या सोहळ्याचे संयोजक कैलास कोते हे सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणारे नेते आहेत. या सोहळयास दरवर्षी शिर्डीकर मोठया संख्येने हजेरी लावतात. प्रत्येकाला हे आपल्या घरातील कार्य असल्यासारखे वाटते. हे या सोहळयाचे वैशिष्टय आहे. संयोजक धनराज कोते यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
दरम्यान, जेमतेम आर्थिक परिस्थिती असली की विवाह समारंभामुळे कुटुंब कर्जबाजारी होते. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होतात. सामुदायिक विवाह चळवळ हे अशा अनेक सामाजिक आणि आर्थिक समस्यांवरील उत्तर आहे. मागील २३ वर्षात तब्बल २ हजार मुलींचे कन्यादान करण्याचे भाग्य आपल्या परिवाराला लाभले. ही श्री साईबाबा आणि श्री संत जनार्दन स्वामी यांची कृपा आहे, असे सामुदायिक विवाह सोहळयाचे संयोजक कैलास कोते यांनी म्हटले.