निलेश ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील हातगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा मध्ये यशस्वी झाले आहेत. त्याबद्दल दि.१ एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले.
या शाळेतील इयत्ता २ री मधील ६ विद्यार्थी हिंद सेवा मंडळाच्या परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत. त्याचबरोबर नॅशनल बेसिक मॅथ आॅलम्पियाड या गणिताच्या परीक्षेत दहा विद्यार्थी उत्तम गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.नुकताच मंथन स्पर्धा परिक्षेचा निकाल लागला आहे त्यामध्ये सुध्दा दुसरी मधील विद्यार्थी चांगले गुण मिळवून यशस्वी ठरले आहेत. त्याच बरोबर चित्रकला, हस्ताक्षर, नृत्य, वेशभूषा आदी कलागुणांच्य स्पर्धेत सहभागी होत यात सुध्दा यशस्वी झाले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्यांना शाबासकी म्हणून व जास्तीची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोधेगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी डॉ शंकर गाडेकर उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष रामेश्वर घुले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
विद्यार्थ्यांचे कौतुक करताना डॉ गाडेकर म्हणाले की, आजचे युग स्पर्धेचे युग आहे जो डिपमध्ये स्टडी करेल तोच स्पर्धेत टिकणार आहे. चांगले विचार आणि सकस आहार माणसाला मजबूत करतो. अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची सवय वैचारिक परिपक्वता आणते, कर्म ही धर्म है! असे म्हणत विद्यार्थ्यांनी न चुकता आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. एक आदर्श शाळा एक आदर्श गाव निर्माण करते म्हणून पालकवर्गानी शाळेला सहकार्य केले पाहिजे असे आवाहन डॉ गाडेकर यांनी केले.
पालक वर्गाच्या वतीने डॉ अरुण भिसे, बद्री बर्गे यांनी मनोगत व्यक्त करत शाळेला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात कु अंजली ढाकणे, कु अयोध्या सुपेकर, कु सिध्दी पलाटे, कु सृष्टी कासुळे, कु सान्वी लहासे, कु स्वरा काळे, विपुल वाघमारे, राजवीर ढाकणे, स्वानंद भिसे, महेश मासाळ, सार्थक अभंग, समर्थ अभंग, वरद गिरी, सार्थक खांडवे, श्रेयश घुले आदी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मिशन आपुलकी अंतर्गत पालक श्री रामेश्वर ढाकणे यांनी पाच हजार रुपये व डॉ गाडेकर यांनी ५०० रुपये सहकार्य राशी जमा केली.
कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता, प्रास्ताविक इयत्ता दुसरीचे वर्ग शिक्षक विष्णू वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन संजय सुपेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पुरुषोत्तम गणेश, बाळासाहेब वाघुंबरे, एकनाथ घुगे, संजय भालेकर, बाबासाहेब लहासे, रेश्मा धस, सुंदर सोळंके, मनीषा हरेल यांच्यासह विनीत बावणे या माजी विद्यार्थ्यांने परिश्रम घेतले.