संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क / राजेंद्र गडकरी
शिर्डी – श्री साई भक्तांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान व्यवस्थापनाने श्री साई मंदिरात प्रवेश करण्यासाठी ऑनलाईन दर्शन पास बरोबरच आता ऑफलाईन दर्शन पास सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले असून उद्या बुधवारपासून दररोज दहा हजार ऑफलाइन दर्शन पास देण्यात येणार आहे. अशी माहिती श्री साईबाबा संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत यांनी दिली आहे .
त्यांनी पुढे म्हटले आहे की, 7 ऑक्टोबरला राज्यातील धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुले झाली असल्याने भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे .मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ऑनलाइन दर्शन पासेस सुरू होते. मात्र ऑनलाईन दर्शन पास मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या .दूरवरून आलेल्या साईभक्तांची गैरसोय लक्षात घेऊन व साई भक्तांची मागणीचा विचार करून श्री साईबाबा संस्थान प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडे वारंवार त्यासंदर्भात प्रयत्न केले व त्याला यश आले असून दिनांक 17 नोव्हेंबर पासून ऑनलाईन दर्शन पास बरोबरच ऑफलाइन दर्शन पास साईबाबा संस्थान देणार आहे. दररोज दहा हजार ऑफलाईन दर्शन पास ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तरी साईभक्तांनी दर्शन घेताना मास्क वापरावा. सुरक्षित अंतर ठेवावे .वारंवार सॅनिटायझर ने हात धुवावेत .विनाकारण परिसरामध्ये गर्दी करू नये व बाहेरून शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांनी शक्यतो ऑनलाईन दर्शन पास घेऊन यावे .असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत यांनी केले आहे.