निलेश ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
भारजवाडी : श्री संत भगवानबाबांनी प्रारंभ केलेल्या नारळी सप्ताहाच्या ८९ व्या वर्षीचे यजमानपदाचे शिवधनुष्य हे भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या भारजवाडी ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. श्री संत भगवानबाबांनी फिरता नारळी सप्ताहाचा नाविन्यपूर्ण उपक्रम ८९ वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह या ठिकाणी सुरू केला. त्यांचे पश्चात तिच सप्ताहाची परंपरा द्वितीय उत्तराधिकारी वै.गुरुवर्य श्री संत भिमसिह महाराज यांनी सुरू ठेऊन बाबांचे कार्य सुरू ठेवले होते. वै.गुरुवर्य भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचे तृतीय मठाधिपती महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. हा नारळी सप्ताह वैभवशाली असल्याने महाराष्ट्रातून लाखो भाविक सप्ताहामध्ये आठवडाभर उपस्थित आहेत.
नारळाचे यजमानपद स्विकारलेले ग्रामस्थ आठवडाभर तन मन आणि धन खर्ची घालत गुरूची सेवा करत असतात .
४ एप्रिल रोजी हा महामहोत्सव सुरू झाला असून सप्ताहामध्ये भागवताचार्य केशव महाराज उखळीकर यांच्या रसाळ वाणीतून ७ दिवस श्रीमद्भागवत कथेचा आस्वाद भाविकांनी घेतला आहे. सप्ताहामध्ये अनुक्रमे महंत श्री.कृष्णा महाराज शास्त्री, तुकाराम महाराज मुंडे , ज्ञानेश्वर महाराज जळकीकर , निवृत्ती महाराज देशमुख ईंदुरीकर , अमृत महाराज जोशी, केशव महाराज ऊखळीकर यांच्या कीर्तनसेवा झाल्या आहेत. सोमवार दि.१० एप्रिल रोजी रात्री ९ ते ११ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री यांचे जागराचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. मंगळवार दि.११ एप्रिल रोजी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर समस्त भारजवाडी ग्रामस्थांच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ इ. धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
सप्ताहातील सर्वांत मुख्य आकर्षण म्हणजे ज्ञानेश्वरी भावकथेच्या रूपाने ज्यांनी देशभरातील भाविकांना ज्ञानेश्वरीतील ज्ञान सांगून वारकरी संप्रदायाकडे आकर्षित केले आहे, असे श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबांचे कीर्तन. शास्त्री बाबांच्या जागराच्या कीर्तनाला जमलेली लाखो भाविकांची रेकॉर्डब्रेक गर्दी डोळ्यांचे पारणे फेडणारी असते.