अहमदनगर एसपी राकेश ओला यांना निवेदन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- शेवगाव शहरात दि.१४ मे रोजी छत्रपती संभाजी जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकी दरम्यान झालेल्या दंगली मध्ये पोलिसांनी सुड भावनेने वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख, नगरसेवक कैलास तिजोरे व इतर सहकाऱ्यांवर जाणीवपूर्वक दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे, दक्षिण जिल्हा महासचिव योगेश साठे, उत्तर जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, पाथर्डी तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के, ॲड. योगेश गुंजाळ, फिरोज पठाण, संगीता ढवळे, सुनीता जाधव, जीवन पारधे, विजय गायकवाड, संजय चव्हाण, लाल निशाण पक्षाचे अनंत लोखंडे यांच्या सह्या आहेत.

दि. १४ मे रोजी रात्री ९ वा. शेवगाव शहरातून निघालेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या मिरवणुकी दरम्यान शिवाजी चौकात हिंदू मुस्लिम दंगल झाली. या दंगलीत मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच या दंगलीमुळे शेवगाव शहरात प्रचंड दहशतीचे वातावरण तयार झाले असून ज्यांनी दंगल घडवून आणली त्या समाज कंटकांवर क्डक कारवाई करावी. मात्र केवळ सुडाच्या भावनेने व राजकीय आकसापोटी निरपराध लोकांना गोवण्याचे षडयंत्र मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली.

प्रत्यक्षात गुन्हा घडला त्यावेळी म्हणजेच दि. १४ मे रोजी प्रा. किसन चव्हाण हे सायंकाळी ६ वाजे पर्यंत तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त औरंगाबाद येथील डॉ. मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात झालेल्या जयंती महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या नंतर प्रा. किसन चव्हाण हे शेवगाव पासून २५ किलोमिटर अंतरावर असलेल्या बोधेगाव येथे रात्री ९ वाजे पर्यंत एका लग्न सोहळ्यात व वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित होते. पावणे दहा च्या सुमारास ते आपल्या शेवगाव येथील घरी पोहचले रात्री ९:५४ मिनिटांनी पाथर्डी चे पोलीस निरीक्षक मुटकुळे यांचा प्रा. किसन चव्हाण यांना फोन आला. शिवाजी चौकात आपले पदाधिकारी पाठवा म्हणजे दंगल शांत करण्यास मदत होईल. असे ते म्हणाले. त्यानंतर रात्री ९:५९ मिनिटांनी व १०:२९ मिनिटांनी प्रा. किसन चव्हाण यांनी शेवगाव चे पोलीस निरीक्षक पुजारी यांना २ वेळा फोन केले पण त्यांनी फोन घेतले नाहीत. त्यामुळे प्रा. किसन चव्हाण हे स्वतः रात्री १०:४५ वा शेवगाव पोलीस स्टेशन ला गेले व पुजारी यांना फोन केला. पोलीस स्टेशन मधील २०ते २५ पोलिसांना शिवाजी चौकात बोलवा असे ते म्हणाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वा. पोलीस स्टेशन ला जाऊन डी. वाय. एस. पी. संदीप मिटके व पाटील यांना पाठवून दंगल खोरांवर कडक कारवाई करावी मात्र विनाकारण कुणालाही आरोपी करू नये अशी विनंती त्यांनी केली. मात्र शेवगाव चे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी मागील घटनेचा राग मनात धरून सुडाच्या भावनेतून प्रा. किसन चव्हाण व त्यांच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे.
यापूर्वी दि.१३ ऑगस्ट २०२२ रोजी शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत प्रा. किसन चव्हाण व पोलीस निरीक्षक पुजारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. त्यामुळे ३० ऑगस्ट २०२२ रोजी भाजप च्या आ. मोनिका ताई राजळे यांच्या सांगण्यावरून प्रा. किसन चव्हाण यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस स्टेशनवर ५ हजार कार्यकर्त्यांनी मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक पुजारी यांचा निषेध नोंदवित त्यांच्या बदलीची मागणी केली होती.
२६ डिसेंबर २०२२ रोजी हजरत सोनामिया यात्रे निमित्त निघालेल्या फुलांच्या चादर मिरवणुकीत देखील पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी विनाकारण लाठी चार्ज केला. त्यात अनेक महिला, तरुण कार्यकर्ते, लहान मुले जखमी झाले होते या घटनेच्या निषेधार्थ प्रा. किसन चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आपल्या कार्यकर्त्यासह ठिय्या आंदोलन केले होते. तसेच २६ एप्रिल रोजी शेवगावच्या क्रांती चौकात पुजारी हटाव शेवगाव बचाव असे आंदोलन प्रा. किसन चव्हाण, प्यारेलाल शेख, नगरसेवक कैलास तिजोरी, कॉ. संजय नांगरे, सोमनाथ मोहिते व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या सर्व घटनांचा राग मनात धरून केवळ आकसापोटी प्रा. किसन चव्हाण व त्यांच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांच्या अटकेचे सत्र सुरू केले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी व ज्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही अश्या कार्यकर्त्यांची नावे या गुन्ह्यातून वगळण्यात यावीत अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी अशोक देव्हढे, प्रमोद आढाव, अनिल पाडळे, प्रवीण ओरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.