शेवगाव आगाराची पहिली बस अयोध्यासाठी रवाना
निलेश ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे दि.२२ जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. या सोहळ्यासाठी देशभरातील निवडक व्यक्तींनाच निमंत्रित करण्यात आले होते.
प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यानंतर देशातील जनतेसाठी दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून,प्रत्येकाला रामलल्लाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे. आपल्या राज्यातील जनतेला अयोध्या दर्शन सुकर व्हावे म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यातील ठिक ठिकाणच्या बस स्थानका मधून भाविकांना बस उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाठीमागे नगर येथील तारकपूर बस आगार च्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली बस अयोध्यासाठी पाठवण्यात आली होती. शेवगाव आगाराने देखील तालुक्यातील रामभक्तांसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली. गुरुवारी (दि.२४) शेवगाव तालुक्यातील पहिली बस ‘आयोध्या एक्स्प्रेस’ अयोध्यासाठी रवाना झाली.
काही महिन्यांपूर्वी शेवगाव आगारात दाखल झालेली आधुनिक सोईसुविधायुक्त हिरकणी गाडी आगारा मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तालुक्यातील घोटण या गावातील ४३ प्रवाशांना घेऊन ही गाडी मार्गस्थ झाली. यावेळी ‘आयोध्या एक्स्प्रेस’ला फुलांनी सजविण्यात आले होते. गाडी सोबत दोन चालक असून एक वाहतूक निरीक्षक सोबतीला आहेत.
दि.२४ एप्रिल ते २९ एप्रिल असा ५ दिवसांचा हा प्रवास असून,बस मधील प्रवाशांना अयोध्याबरोबरच तीन ज्योतिर्लिंगाचे दर्शन सुध्दा घडणार आहे.या यात्रेसाठी प्रति व्यक्ती ७ हजार रुपये भाडे असून राहण्या खाण्याचा खर्च ज्याचा त्याने करायचा आहे. आगारा मार्फत दुसऱ्या फेरीचे नियोजन सुरू असून काही बुकींग सुद्धा झाले आहे. मे महिन्यात अयोध्या एक्स्प्रेस ची दुसरी फेरी जाणार असून ज्यांना जायचे आहे, त्यांनी बुकींग साठी शेवगाव आगारात संपर्क करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक अमोल कोतकर यांनी केले आहे.
दरम्यान, एखाद्या गावातून ४३ प्रवासी झाले तर त्या गावांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापक श्री कोतकर यांनी सांगितले.