शेततळयाच्या माध्यमातून कोरडवाहू शेतावर फुललं नंदनवन…!

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Ahemnagar Farmer-

संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असलेली कोरडवाहू जमीन… अपुऱ्या पाण्यामुळे तुटपुंजे उत्पन्न… असे एकेकाळी वीस एकर शेतीवरील चित्र होते. आज मात्र या शेतीतून डाळीब, कलीगड, द्राक्षे, टोमॅटो, दूधी भोपळा या फळ व भाजीपाला पिकांचे भरघोस उत्पन्न निघत आहे. हो किमया साधली गेली आहे राहाता तालुक्यातील पिंपरी लोकाई या गावातील सुभाष गडगे यांच्या शेतात…! एकेकाळी कोरडवाहू शेतीत उत्पन्न नसल्यामुळे ट्रक ड्रायव्हरची नोकरी करणाऱ्या सुभाष गडगे यांची यशोगाथा जाणून घेऊ या !
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकी पॉली हाऊस बांधकाम, शेततळे, ठिबक सिंचन योजना आणि फळबाग लागवड अनुदान योजनेचा लाभ घेतला आणि कुटुंबातील सदस्यांच्या मेहनतीमुळे वार्षिक 30 ते 35 लाखाचे उत्पन्न मिळविले. खंबीर साथ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर आणि अनुदानाचा योग्य वापर यामुळे हे शक्य झाले, अशी भावना शेतकरी सुभाष गडगे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेत सुभाष गडगे यांना ‘शेततळया’ चा लाभ मिळाला. पॉलीहाऊस ही मंजूर झाले. योजनांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत शेतीमध्ये या तंत्रज्ञानाची खुबीने वापर केला. त्यामुळे आज त्यांचे २० एकर कोरडवाहू क्षेत्र बागायती झाले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेद्वारे शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. कोरडवाहू शेत जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असल्याने शेतीमधून कमी उत्पन्न मिळते. शेतक-यांसाठी शेततळे तयार करणे एक लाभदायी आणि शेतकरी हिताचा प्रकल्प ठरु शकतो. त्यासाठी शेततळी काळाची गरज आहे.
सुभाष गडगे यांच्या कुटुंबात पत्नी, तीन भाऊ, भावांच्या बायका असे एकत्रित कुटुंब आहे. त्यांच्याकडे २० एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे. पिंपरी लोकाई गावात दरवर्षी १५० ते २०० मि मी पाऊस होतो. त्यामुळे पाण्याची चार महिनेच उपलब्धता असते. शेतीसाठी पाण्याच्या विवंचनेत असतानाच राहाता तालुका कृषी अधिकारी यांनी त्यांचा शेततळे अनुदानाचा अर्ज मंजूर केला. तब्बल एक एकर क्षेत्रात त्यांनी शेततळे उभारले असून १ कोटी ५६ लाख लीटर पाण्याचा साठा उपलब्ध झाला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे ‘फुले जल’ या मोबाईल अॅपद्वारे पाण्याचे नियोजन शक्य झाले. बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्राच्या ‘माऊचर मीटर द्वारे जमिनीतील पाण्याच्या ओलाव्याची माहिती मिळण्यास मदत झाली. या माध्यमातून वर्षाला ५० लाख लिटर पाण्याची बचत झाली.
सुभाष गडगे यांनी त्यांच्या शेतात नगदी पिके घेण्यासाठी नियोजन केले. कृषी विभागाने पॉली हाऊस’ मंजूर केले. पॉली हाऊसचे पाणी शेततळयात साठविल्यामुळे त्या पाण्यापासून टोमॅटो, दूधी भोपळा, कलींगड अशी नगदी पिके घ्यायला सुरुवात केली. पॉली हाऊसला ‘रेन वॉटर हाव्हेस्टींग’ केले. यामुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ झाली. सहा एकर क्षेत्रावर द्राक्षाची बाग लावली. फळबाग योजनेतून अनुदानही मिळाले.
कृषी विभागाच्या योजनांचा लाभ ध्येण्यापूर्वी शेतामध्ये जेमतेम ५ ते ६ पोती बाजरीचे उत्पादन होत असे. या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणे शक्य नव्हते. त्यामुळे पावसाळया व्यतिरीक्त इतर वेळेस कामगार म्हणून काम करण्याची पाळी कुटुंबातील सदस्यांवर येत होती. शेततळी, पॉली हाऊस यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील उत्पन्न वर्षाला सुमारे १७ ते १८ लाख रुपये झाले आहे. त्यामुळे सन्मानाने जीवन जगणे शक्य झाले आहे, अशी भावना सुभाष गडगे यांची आहे.
राहाता तालुक्यातील हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. प्रतिकूल परिस्थितीत पाण्याचे योग्य नियोजन व एकात्मिक शेतीचा अवलंब करुन त्याला शासनाच्या योजनांची सांगड घालून सुभाष गडगे आणि त्यांच्या कुटुंबाने शेतीमधून उत्पन्नात वाढ केली आहे. श्री. गडगे यांचा आदर्श परिसरातील शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करावी, अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
21,800SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!