शिर्डी-सावळीविहीर एमआयडीसीत ‘१ हजार कोटी’च्या डिफेन्स क्लस्टरला मंजुरी
महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा., मा.खा.सुजय विखे पा. यांचा विशेष पुढाकार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी : महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. व मा.खा.सुजय विखे पा. यांच्या प्रमुख पुढाकारातून तथा मोठ्या प्रयत्नाने शिर्डी-सावळीविहीर नजिक नव्याने मंजूर झालेल्या एमआयडीसीमध्ये १ हजार कोटी रुपयांच्या डिफेन्स क्लस्टरला मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुढील काळात शिर्डी एमआयडीसी लवकरच मोठ्या झपाट्याने विकसित होऊन अस्तित्वात दिसणार आहे. या एमआयडीसीमुळे राहता तालुक्यात रोजगारची मोठी संधी उपलब्ध होईल.
संरक्षण मंत्रालय, भारत सरकार आणि राज्य शासनाच्या वतीने शिर्डी एमआयडीसी येथे डिफेन्स क्लस्टरला उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मंजुरी मिळाली आहे. या अंतर्गत शिर्डी एमआयडीसी येथील २०० एकर परिसरात १ हजार कोटी रुपये खर्च करून एक मोठे डिफेन्स क्लस्टर उभारले जाणार आहे. या डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून राहाता तालुक्याचे भूमिपुत्र गणेश निबे यांच्या कंपनीमार्फत संरक्षण मंत्रालय आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लि. यांच्या संयुक्त विद्यमानाने विमानाचे पार्ट्स बनविणाऱ्या कंपनीची घोषणा उद्योगमंत्री
उदय सामंत यांनी केली आहे. येणाऱ्या १० दिवसात या डिफेन्स क्लस्टरचा एमओयू (MOU) शिर्डी येथे साईन करून त्या जागेचे भूमिपूजन केले जाणार आहे.
या २०० एकरावर उभ्या राहणाऱ्या डिफेन्स क्लस्टरच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच हजार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. उर्वरित एमआयडीसी विकसित करण्यामध्ये देखील फार मोठा फायदा होणार आहे. डिफेन्स क्लस्टरला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच विशेषतः जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे व मा.खा.सुजय विखे पा.यांचे राहाता मतदारसंघातील अनेक सामाजिक संघटनांनी व युवकांनी आभार मानले आहेत.