शिर्डी प्रशासन करतेयं अतिक्रमणमुक्त नाल्याचे पथदर्शी काम..!

👉प्रशासनाच्या सांघिक कामगिरीमुळे नाले घेतायेत मोकळे श्वास
👉शिर्डीकरांची संभाव्य पूरपरिस्थितीतून होणार कायमची सूटका

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शिर्डी –
‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या संत तुकारामांच्या उक्तीचा प्रत्यय आपणास शिर्डी येथे प्रशासन सांघिकपणे राबवितं असलेल्या नाल्यावरील अतिक्रमणमुक्त मोहीमेतून दिसून येत आहे‌. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डीतील नाल्यावरील अतिक्रमण युध्दपातळीवर काढण्यात येत आहेत. या मोहीमेमुळे नाले,ओढे मोकळा श्वास घेत असून अतिवृष्टीमुळे शिर्डीत भविष्यात कधीच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होणार नाही. असे दूरदर्शी, पथदर्शी काम शिर्डीतील सर्व शासकीय विभाग एकमेकांशी समन्वय ठेवत करत आहेत.


शिर्डी व‌ परिसरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात उच्चांकी पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे शिर्डीत पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नगरपरिषदेमधील अनेक भाग पाण्याखाली गेले. नागरिकांच्या घरे, झोपड्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे शिर्डीकरांचे अतोनात हाल झाले. कधी नव्हे ते साईबाबा संस्थान २०० रूम रूग्णालय, शासकीय विश्रामगृह पाण्याखाली गेले. शिर्डीच्या या नाजूक परिस्थितीचा अंदाज घेत खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी पुरग्रस्तांच्या भेट घेऊन मदत ही दिली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी २० सप्टेंबर २०२२ रोजी शिर्डीतील पूरपरिस्थितीची पाहणी करत नगरपरिषदेत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यात शिर्डीतील पूरपरिस्थिती निर्माण होण्यास येथील नाले व ओढ्यावरील अतिक्रमणचं कारणीभूत असून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता या अतिक्रमणावर बुलडोझर फिरविण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले.


महसूलमंत्र्यांच्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी अतिक्रमण निर्मूलनासाठी योजनापूर्वक नियोजन आखले. यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ११ पथके तयार करण्यात आली‌ आहेत. यामध्ये महसूल, पोलीस, पाटबंधारे, जलसंधारण, लघु पाटबंधारे, मलनिस्सारण विभाग, नगरपरिषद , भूमी अभिलेख, ग्राम विकास , साईबाबा संस्थान या विभागांच्या मदतीने संयुक्त मोहीम आखण्यात आली. नाला क्र.३४ व नाला क्र.३५ वर प्रामुख्याने अतिक्रमण झाले होते. यासाठी २ बुलडोझर व ५ पोकलेन, इतर मनुष्यबळ व सामग्रींचा वापर करून अतिक्रमणाची मोहीम युद्ध पातळीवर राबविण्यात येत आहे. नाले, ओढ्यावरील अतिक्रमण काढण्याबरोबर खोलीकरण व रूंदीकरणाचे काम ही करण्यात येत आहे. वाहत्या पाण्याचा प्रवाह सुरळीत झाल्यामुळे शिर्डीकरांना पूराचा संभाव्य फटका बसणार नाही. शेत पीके, नाल्या शेजारील घरे, दुकान यांचे नुकसान होणार नाही. संभाव्य जीवित व वित्तहानी टळणार आहे. अतिवृष्टीमुळे पुनःश्च पूरपरिस्थिती निर्माण होणार नाही. असे पथदर्शी, शाश्वत काम शिर्डीत होत आहे.


नाले, ओढे अतिक्रमणमुक्त करण्याची ही विशेष मोहीमेचे संनियंत्रण राहाता तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राहाता भूमी अभिलेख उपअधीक्षक नरेंद्र पाटील, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी.शिंदे, संजय पटलवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी मनोज ढोकचौळे व पी.बी.गायसमुद्रे‌ हे करत आहेत. एकूण ११ पथकांमध्ये विविध विभागांच्या ५० अधिकारी व १०० पेक्षा जास्त कर्मचारी यशस्वीपणे कामकाज करत आहेत‌.
या मोहीमेच्या प्रगतीविषयी माहिती देतांना शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे म्हणाले, “शिर्डीच्या बाजूच्या सात ते आठ गावातील नैसर्गिक नाले व ओढ्याच्या पाण्यामुळे शिर्डी जलमय होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. शिर्डी, निमगाव, निघोज, रूई, पिंपळेवाडी, शिंगवे येथे गोदावरी नदीपात्राला मिळणाऱ्या व साकोरी चर योजनेतील शिरंकाडे नाल्यावरील संपूर्ण अतिक्रमण काढण्याचे काम प्रशासन युध्दपातळीवर करत आहे. ओढे व नाल्यांच्या नकाशानुसार हद्दी व खूणा निश्चित करण्यात आल्यानंतर प्रशासन सांघिकपणे अतिक्रमण निर्मूलनाची ही मोहीम राबवत आहे. या मोहीमेसाठी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींचेही सहकार्य लाभत आहे. शिर्डीच्या इतिहासातील आजपर्यंत ही सर्वात मोठी मोहीम आहे. शाश्वत, पथदर्शी असे काम सुरू असल्याने शिर्डी पुन्हा जलमय होणार नाही. ओढे, नाले शंभर टक्के अतिक्रमणमुक्त तसेच रूंदीकरण, खोलीकरण होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार आहे.”

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!