शिर्डीत गावठी कट्टा बाळगणारा सराईत आरोपी कट्टयासह जेरबंद ; अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
शिर्डी: शिर्डी येथे गावठी कट्टा बाळगणारा सराईत आरोपी कट्टयासह जेरबंद करण्याची कारवाई अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने केली आहे. अमोल सिध्दार्थ दिवे (वय २४, रा.गोवर्धननगर, शिर्डी, ता.राहाता,जि.अहिल्यानगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचचे पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड आदींच्या टीमने ही कारवाई केली आहे.
एसपी राकेश ओला यांनी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचला जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणा-यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुषंगाने पोनि दिनेश आहेर यांनी अहिल्यानगर क्राईम ब्रॅंचला व तपासी टीमला अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणा-यांची माहिती काढुन कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
अहिल्यानगर क्राईम ब्रॅंच टीमने दि.१४ फेब्रुवारी २०२५ रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना माहिती मिळाली की, अमोल सिध्दार्थ दिवे (रा.शिर्डी) हा गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने हॉटेल राजेजवळ, कनकुरी रोड, नांदुर्खी रोड येथे थांबलेला असल्याची माहिती मिळाली. तपासी टीमने माहिती ठिकाणी सापळा रचून संशयीतास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने अमोल सिध्दार्थ दिवे (वय २४,रा.गोवर्धननगर, शिर्डी, ता.राहाता,जि.अहिल्यानगर) असे असल्याचे सांगीतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून ५० हजार रु. किंमतीचे एक गावठी पिस्टल, १ हजार ५०० रु. किं. एक जिवंत काडतुस व २० हजार रु. किं. एक मोबाईल असा एकुण ७० हजार रु. .किं.मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ताब्यातील आरोपीकडे मिळालेल्या अगिशस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्याने अग्नीशस्त्र हे फरारी मुजम्मिल हारुन बागवान रा. श्रीरामपूर याच्याकडून खरेदी करुन विक्रीकरीता आणल्याचे सांगितले. आरोपीविरूध्द शिर्डी पोलीस ठाण्यात गुरनं १५८/२०२५ भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्यात हे करीत आहे.