शिक्षक बँकेचे संचालक किसन खेमनर यांची संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : प्राथमिक शिक्षक बँकेत नुकत्याच झालेल्या सत्तांतराच्या नाट्यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक संघाने अहमदनगर जिल्ह्यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घातले आहे. गेल्या वर्ष दीड वर्षापासून जिल्हाध्यक्षपदाचा जिल्ह्यामध्ये खेळखंडोबा होऊन बसला आहे.
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेतील सत्तेच्या माध्यमातून सातत्याने राज्य नेतृत्वाला शह देण्याचा प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यातून होत आहे. मध्यंतरी दोन महिन्यांपूर्वी राजीनामा नाट्य करताना राज्य संघाच्या नेतृत्वावर आरोप करून राज्य संघाच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न अहमदनगर जिल्ह्यातूनच झाला.
त्यानंतर नुकत्याच झालेल्या अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पदाधिकारी निवडीमध्ये संघाला मानणारे सहा संचालक फुटल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून एकीकडे राज्य संघाच्या नेतृत्वावर टीका करून राजीनामा देण्याची नौटंकी करून पुन्हा दोन दिवसानंतर स्वतःकडे अध्यक्षपद घेणाऱ्या जिल्हाध्यक्षांवर राज्य संघामार्फत लवकरच कारवाईचे संकेत प्राप्त होत आहेत.
नुकत्याच झालेल्या पदाधिकारी निवडी मध्ये शिक्षक संघाचे ज्येष्ठ संचालक किसन खेमनर यांचा ठरवून पराभव करण्यामध्ये जिल्हा संघाचे जिल्हा नेतृत्व यशस्वी झाले आहे. खेमनर यांचा पराभव करण्यामागचा हेतू आता स्पष्ट होत आहे. शिक्षक संघाशी एकनिष्ठ असलेले खेमनर चेअरमन झाले तर जिल्ह्यातील संघातर्गत विरोधकांना बळ मिळू शकते. तात्कालीन सत्ताधारी गट खेमनर यांना व्हाइस चेअरमन करायला तयार होता. परंतु चेअरमन करायला तयार नव्हता. याच कारणातून शिक्षक संघाअंतर्गत संघावरील वर्चस्वाच्या राजकारणापायी बँकेच्या चेअरमन निवडीमध्ये खेमनर यांचा पराभव जाणीवपुर्वक घडवून आणला.
तसेच चेअरमन बदलला तर निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांकडून तत्कालीन सत्ताधारी तांबे गटावर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची धार कमी होऊ शकते, हाही धुर्त हेतू असल्याची कुजबूज तांबे यांच्या गोटामधून ऐकायला येत आहे.
तांबे गटाच्या संचालकांवर तांबे यांची मजबूत पकड होती, हे निर्विवाद असतानाही शिक्षक बँकेच्या चेअरमन पदी अवघी सात मते असलेल्या शिक्षक परिषदेचे अविनाश निंभोरे यांना १३ मते व किसन खेमनर यांना आठ मते पडली. मग ६ मते नेमकी कशी फुटली व कोणाच्या आदेशाने फुटली, यावर शिक्षक संघाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये विचारमंथन सुरू आहे. जिल्ह्यातील शिक्षक संघाअंतर्गत विरोधी गटाकडून तसा अहवाल राज्याकडे पाठवला असून या अहवालास अनुसरून राज्य नेतृत्वाने जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी संघनिष्ठ किसन खेमनर यांचीच थेट वर्णी लावून त्यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्याचे संकेत राज्यस्तरीय राज्य संघाचे पदाधिकाऱ्यांकडून प्राप्त होत आहेत.
यानिमित्ताने संघाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न व संघाच्या निष्ठावान कार्यकर्त्याचा बँकेच्या पदाधिकारी निवडी मध्ये झालेला अपमान भरून काढण्याचे सुतोवाच राज्य संघाकडून केले असून याबाबत येत्या दहा दिवसांमध्ये निर्णय घेतला जाणार आहे. अशी माहिती शिक्षक संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून मिळाली आहे.
शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांना त्यांच्या नेतृत्व मानणारे कार्यकर्ते आणि पदाधिकारी “तात्या” म्हणून संबोधतात. “तात्यांनी आता अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक संघाच्या बांधणी आणि फेररचनेत लक्ष घातले असुन संगमनेरला तसेच जिल्हास्तरावर थेट हस्तक्षेप करीत बऱ्याच शिक्षक संघ धुरीणांच्या खाजगी भेटी घेणे सुरू केले आहे. त्यांच्या गृहभेटींची पहिली फेरी पुर्ण केले आहे. तात्यांना अपेक्षित एकमत घडवून आणण्यात यश आलेले असून आता किसन खेमनर यांच्या खांद्यावर शिक्षक संघाची धुरा देण्याची औपचारिकताच बाकी आहे”, अशी गोपणीय बातमी शिक्षक संघाच्या जेष्ठ राज्य पदाधिकाऱ्याने आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.