संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या संशयातून तपासणीसाठी घेतले. पुन्हा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ५० हजार रूपयांची मागणी केली. प्रत्यक्षात तडजोडीअंती ३० हजार स्वीकारण्याची तयारी दर्शविणारा वीज वितरणचा सहायक अभियंत्यावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक अभियंता कमलेश युवराज पवार (वय२९, हल्ली रा. सावेडी, अहमदनगर, मूळ रा.प्लॉट न १२०, सी २ भवनच्या पाठीमागे, खुटवडनगर, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
अंभोरा (ता. आष्टी) येथे आंबेश्वर कृषीवन पर्यटन हे रिसॉर्ट आहे. या ठिकाणी त्यांनी महावितरण अहमदनगर शाखा चिचोंडी पाटील (ता.नगर), यांच्याकडून विद्युत जोडणी घेतली आहे. त्यांच्या वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याच्या संशयातून सहायक अभियंता कमलेश युवराज पवार यांनी मीटर तपासणीसाठी काढून घेतले. त्यानंतर पुन्हा वीज जोडणी पूर्ववत देण्यासाठी वरिष्ठ उपअभियंता कोपनर यांच्याकरिता ५० हजारांची मागणी केली. आंबेश्वर कृषीवन पर्यटन चालक यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गहिनीनाथ गमे आणि सहाय्यक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शरद गोरडे यांनी ता. २४ मार्च २०२३ रोजी चिचोंडी पाटील गावात सापळा लावला. सहायक अभियंता कमलेश पवार यांनी तडजोडीअंती ३० हजार रूपयांची लाच स्वीकारून वीज जोडणी पूर्ववत करण्याची तयारी दर्शविली. पंचासक्षम केलेल्या मागणीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता.३०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.