संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : नगर तालुक्यातील टाकळी काझी येथील शेतकरी कुटुंबातील तिघा मुलांना घरातील खाद्यपदार्थांतून विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी (दि.९) घडली. या घटनेतील दोघा मुलांचा मृत्यू झाला आहे. तर एकावर अहमदनगर येथील खासगी रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे टाकळी काझी गावावर शोककळा पसरली आहे.
टाकळी काझी (ता.नगर) येथे बापू साहेबराव म्हस्के व भाऊसाहेब साहेबराव म्हस्के या दोघा भावांचे एकत्रित कुटुंब आहे. बापू हे गवंडी काम करतात तर भाऊसाहेब हे चालक म्हणून काम करतात. त्यांच्या घरातील फ्रिजमध्ये बुधवारी (दि. ८) संत्र्याचा रस करून ठेवलेला होता. शिवराज बापू म्हस्के (वय साडेचार वर्षे), स्वराज बापू म्हस्के (वय दीड वर्षे) तसेच सार्थक भाउसाहेब म्हस्के (वय १४) यांच्या गुरूवारी पिण्यात आले. गुरुवारी सकाळी या मुलांना त्रास सुरु झाला. त्यांना रूग्णालयामध्ये घेऊन जात असताना स्वराज म्हस्के याचा रस्त्यातच मृत्यू झाला तर शिवराज म्हस्के याच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सध्या सार्थक म्हस्के याच्यावर उपचार सुरू आहेत. बापू साहेबराव म्हस्के यांना शिवराज आणि स्वराज ही दोनच मुले होती. पण या दुर्दैवी घटनेत दोघांचाही मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवराज आणि स्वराज यांचा उत्तरीय वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. या अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.