नांदेड – भोकर-हिमायतनगर रोडवर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांना जागीच मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी आहेत. नववधुला घेऊन आरतनी परतनी करुन घरी जात असताना मॅजिक या टेम्पोला विटांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने जोरात धडक दिली आहे. त्यामुळे ही मोठी दुर्घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नववधुला घेऊन आरतनी परतनी करण्यासाठी साखरा ता. उमरखेड जिल्हा. यवतमाळ येथे जात असताना आज संध्याकाळी सहा वाजेदरम्यान ही घटना घडली आहे. या भीषण अपघातात नववधुसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये समोरुन येणाऱ्या विटाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने मॅजिक टेम्पोला जोराची धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात घडला आहे. या घटनेत दोन्ही वाहनांचा अक्षरश: चुराडा झाला आहे.
या घटनेत नववधू पूजा पामनवाडसह, माधव सोपेवाड (30), दत्ता पामनवाड वधूचा भाऊ, सुनिल थोटे आदींचा मृत्यू झाला असून, सुनिता टोपलवाड, अभिनंदन कसबेसह पाच जण गंभीर जखमी झाले. धर्माबाद तालुक्यातील नवरदेव नागेश साहेबराव तमलवाड यांचा 19 फेब्रुवारी रोजी सकाळी साखरा (ता. उमरखेड जिल्हा यवतमाळ) येथे वधूच्या माहेरी थाटामाटात विवाह सोहळा झाला. त्यानंतर सायंकाळी वधू आणि वराकडील मंडळी आरतनी परतनी करण्यासाठी जारिकोटला वराच्या गावी सासरी मुक्काम करुन परत आज मॅजिक गाडी क्रमांक (एम. एच. 29 ए. आर. 3214) ने नवरदेव-नवरीसह इतर नातेवाईक उमरी-भोकरमार्गे साखरा येथे जात असताना भोकरपासून जवळच असलेल्या सोमठाणा फाट्यासमोर टेम्पो क्रमांक (एम.एच 04-9955) ची समोरासमोर जोराची धडक झाली. या धडकेत नववधू पूजा तमलवाड (कनेवाड) सह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला.