संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Mumbai –‘जरी कोणी लॉकडाऊन, लॉकडाऊन म्हणत असेल तरी सुद्धा लॉकडाऊनचा अर्थ आताच नाही. लॉकडाऊनचा आता अजिबात विषय नाही. त्यामुळे लॉकडाऊनची भीती माध्यमांनी सुद्धा घालू नये. मुख्यमंत्र्यांच्या अध्यतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या काल झालेल्या दोन तासाच्या बैठकीमध्ये कुठेही लॉकडाऊनच्या विषयाची चर्चा नाही. पण जरुर निर्बंध वाढवले पाहिजेत. ज्यावेळी ७०० मॅट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळेस ऑटोमोडमध्ये लॉकडाऊन होईल,’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
राज्यात सध्या कोरोना आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू होण्याची भीती पसरली आहे. तसेच अनेक मंत्री कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, अशी मोठी विधाने करत आहेत. मात्र याच दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सध्या लॉकडाऊन लागू करण्याबाबत कुठलाही विचार नसून कडक निर्बंध लागू केले जातील असे सांगितले.
राजेश टोपे म्हणाले की, ‘राज्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा ११ ते १२ हजारांच्या दरम्यान असेल. सध्या डेल्टा आणि ओमिक्रॉनचे रुग्ण यांच्यातले प्रमाण कळणे महत्त्वाचे आहे. राज्यात निर्बंध लागू केलेले आहेत, पण त्याची कठोर पद्धतीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. निर्बंध लावणे हे पहिले पाऊल आहे. सध्या लॉकडाऊनबाबतचा कोणताही विषय नाही. लहान मुलांच्या लसीकरण मोहीमेला सुरुवात करणे हे महत्त्वाचे आहे. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री सर्व प्रशासनाची बैठक घेणार आहेत.’