संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : येथे लष्कराच्या हद्दीजवळील जागेत बांधकामासाठी लष्कराच्या अहमदनगर विभागाच्या नावाने बनावट एनओसी तयार करून नगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची फसवणूक केली. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती मंगेश पाटील व अभय वाघवासे यांच्यसमोर ही सुनावणी पार पडली. कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात याचिकाकर्ते शेख यांचा जबाब नोंदवून व तपासासाठी त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर दाखल करून घ्यावीत, असा आदेश न्यायालयाने तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांना दिला आहे.
अहमदनगर शहर व तालुक्यातील लष्कराच्या हद्दीलगतच्या मालमत्ता, प्लॉटवर बांधकाम परवानगीसाठी आर्मी हेडक्वार्टरकडून ‘ना हरकत दाखला’ दिला जातो. मात्र, उपविभागीय कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या दाखल्यांपैकी काही दाखले बनावट असल्याचे समोर आले आहे. बबन भागचंद बेरड (रा. भिंगार, ता. नगर), आमीर तकी मिर्झा (रा. मुकुंदनगर) व निलेश प्रेमराज पोखरणा इतर ५ जणांच्या प्रकरणात बनावट कागदपत्रे सादर करून उपविभागीय कार्यालयाची फसवणूक झाल्याची फिर्याद महसूल सहाय्यक संजय गोलेकर यांनी दिली आहे. त्यानुसार कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
शेख हे याबाबत दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. पोलिसांकडून केवळ तीनच प्रकरणात तपास सुरू आहे. इतरही अनेक प्रकरणात बनावट एनओसी दिल्या गेल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासात शाकीर शेख हे पोलिसांना मदत करण्यास तयार आहेत. त्यांच्याकडे असलेली कागदपत्रे रेकॉर्डवर घेऊन त्यांचा जबाब नोंदवून घ्यावा. त्या दृष्टीने सर्व एनओसीचा तपास करावा, अशी मागणी त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच तपासी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची दखल घेण्यात न आल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासामध्ये शाकीर शेख यांचा जबाब नोंदवून घ्यावा. त्यांच्याकडे असलेली इतर एनओसी बाबतची कागदपत्रे व पुरावे रेकॉर्डवर घेऊन त्या दृष्टीने तपास करावा, असा आदेश न्यायालयाने तपासी अधिकाऱ्यांना दिला आहे.