संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – घोडेगाव ग्रामीण रुग्णालयाची नूतन वास्तू सुसज्ज आणि प्रशस्त आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वास्तुच्या माध्यमातून नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्यसेवा द्यावी, असे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे बांधण्यात आलेल्या नूतन ग्रामीण रुग्णालय इमारतीचे उद्घाटन आणि लोकार्पण श्री. पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेचे सभापती सुनिल गडाख, सामाजिक कार्यकर्ते भाऊ कोरेगांवकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज गुंजाळ यावेळी उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करतांना मंत्री श्री. पाटील यांनी रुग्णालयाच्या नूतन वास्तूची चांगल्या प्रकारे देखभाल ठेवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. घोडेगावसाठी 44 कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेला मंजूरी देण्यात आली असून अहमदनगर जिल्हयासाठी सुमारे 1 हजार 300 कोटी रुपयांचा पाणी पुरवठयाचा डीपीआर तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यातील विविध विकास कामांना मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या नूतनीकरणासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा केल्याची माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रीमहोदयांनी दीप प्रज्वलन केले आणि इमारतीची पाहणी केली. कार्यक्रमाला आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.