संदीप काळे यांचे ‘ऑल इज वेल’ या तीन भाषिक पुस्तकाचे प्रकाशन.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई : ‘राष्ट्राचा पाया हा विचारांवर अवलंबून असतो. ते विचार जनसामान्य वर्गामध्ये रुजविण्याचे काम, त्या विचारातून एक प्रगल्भ समाज घडविण्याचे काम पत्रकारानी, लेखकानी केलेले आहे. संदीप काळेनी तोच सामाजिककरणाचा पायंडा पुढे नेत आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाज निर्मितीचे काम केलेले आहे. असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.
संपादक, लेखक, निवेदक, संघटक संदीप काळे लिखित ‘ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ या मराठी, हिंदी, इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार ह्या उपस्थित होत्या. खा. हेमंत पाटील, सकाळचे संपादक संचालक श्रीराम पवार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कोश्यारी म्हणाले, ‘खूप कमी काळामध्ये आपल्या यशाचे शिखर संदीप काळेनी गाठलेले आहे. आपल्या आई – बाबा, कुटुंबाप्रति आताही असलेली श्रद्धा ही युवकांसाठी खूप महत्वाचा बोध घेण्यासारखी गोष्ट आहे. ‘ऑल इज वेल’ पुस्तक मी वाचले आणि माझ्या लक्षात आले की, धडपडणाऱ्या, आयुष्यात काहीतरी निर्माण करू इच्छिणाऱ्या प्रत्येक युवकांची ती कहाणी आहे. आणि त्या कहाणीला एका सामाजिक आयामामध्ये, एका शिकवणूकीमध्ये, बांधण्याचे काम संदीप काळे यांनी केले. संदीप काळे यांच्या पुस्तकातून त्यांच्या आई वडिलांचा त्याग व तपस्या, तसेच त्यांचे प्रेम व परिश्रम दिसून येतात असे सांगून आई-वडील तसेच मातृभूमीला स्मरून समर्पण भावनेने कोणतेही कार्य केल्यास ते सर्वश्रेष्ठ ठरते असे राज्यपालांनी सांगितले. पुस्तकाच्या माध्यमातून युवा पिढी व लहान मुले प्रेरणा घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि यामध्ये ते यशस्वी झालेले आहे.’ असे ही ते म्हणाले.
राज्यपालांनी यावेळी संदीप काळे यांच्या आई-वडिलांचा सहद्य सत्कार केला.
श्रीराम पवार बोलताना म्हणाले, ‘संदीप काळे यांनी सामाजिक भूमिका घेऊन आपल्या लिखाणाचे व्रत पुढे नेलेले आहे. त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून अनेक लोकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम केलेले आहे. त्यांचा लोक जोडण्याचा हातखंडाही कमालीचा बोध घेण्यासारखा आहे.
खा. हेमंत पाटील बोलताना म्हणाले, ‘संदीप काळे यांचा आतापर्यंतचा सगळा प्रवास मी अगदी जवळून अनुभवलाय. खूप खाचखळग्याने भरलेला तो प्रवास होता आणि या प्रवासामध्ये त्यांनी कधीही मागे फिरून पाहिलेले नाही. खूप लोकांसोबत त्यांनी जनसंपर्क वाढवला आणि त्या जनसंपर्कातून लोकांची अनेक कामे केली. जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांचे लिखाण अजून फुलत गेले.
डॉ. भारती पवार आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, ‘लिहिणे हे काही सोपे काम नसते, शंभर पुस्तके मी वाचू शकते पण एक पान मी लिहू शकत नाही अशी माझी अवस्था आहे. संदीप काळे यांच्या एकूण जीवन प्रवासाकडे पाहिल्यावर मला माझाही जीवनप्रवास आठवतो की, कशा प्रकारे मी इथवर येऊन उभी राहिले. माझ्याकडेही असे खूप प्रसंग आहेत, खूप काही सांगण्यासारखे आहे पण मला ते शब्दांत मांडता येत नाही. पण, संदीप काळे यांचा हा एकूण सगळा प्रवास पाहिल्यावर तर मला असे वाटते की, आपण सुद्धा आपला प्रवास शब्दामध्ये मांडायला हवा. संदीप काळे यांचे ‘आॅल इज वेल’ हे पुस्तक त्या प्रत्येक युवकांसाठी महत्वाचे आहे ज्यांना आयुष्यामध्ये कुठलीही दिशा सापडलेली नाही. ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचे आहे. अशा त्या प्रत्येक युवकांनी ‘ऑल इज वेल’ हे पुस्तक वाचले पाहिजे.’
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फराह खान यांनी केले. यावेळी, राजकीय, सामाजिक, आणि पत्रकार बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.