संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 20 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यात अजित पवार यांच्यासह बहुतांश विद्यमान आमदारांच्या नावांचा समावेश आहे. अजित पवार स्वतः बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या संभाव्य यादीत नगर शहरातून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची येथे एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या 20 संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली.अजित पवार यांनी नुकतेच बारामती विधानसभा मतदारसंघ सोडण्याचे संकेत दिले होते; पण या बैठकीत बारामती येथून तेच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय पुणे हिट अँड रन प्रकरणात वादाच्या भोवर्यात अडकलेले आमदार सुनील टिंगरे यांच्याही नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. सुनील टिंगरे त्यांच्या वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातूनच मैदानात उतरतील, अशी माहिती आहे. इंदापूरमधून दत्ता भरणे यांचे नाव असून, त्यामुळे भाजपचे हर्षवर्धन पाटील यांची मोठी गोची झाली आहे. येवल्यातून छगन भुजबळ, आंबेगावातून दिलीप वळसे पाटील, दिंडोरीतून नरहरी झिरवळ, रायगडमधून आदिती तटकरे यांची उमेदवारी अंतिम आहे.