संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी आज अहमदनगर शहरातून मोटारसायकल रॅली काढली. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते मुंबई मंत्रालय अशी दि. 5 ते 14 मार्च या कालावधीत महारॅली काढण्यात येणार आहे. तसेच दि. 14 मार्च रोजी मंत्रालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ही रॅली आज अहमदनगर शहरात दाखल झाली. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या मोटरसायकल रॅलीची सांगता जिल्हाधिकारी कार्यालय येथील सभेने झाली. या आंदोलनामध्ये अरुण गाडे, सुभाष कराळे, अभय गट, विलास वाघ या विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. या रॅलीत जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले होते.
आंदोलकांनी त्यांच्या निवेदनात म्हटले की, गेल्या 17 वर्षांपासून सर्वांना जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जातो आहे. परंतु या मागणीची दखल राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. राज्यस्थान, छत्तीसगड आणि झारखंड आदी 6 राज्यांतील 2005 नंतर शासन सेवेत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना एनपीएस रद्द करुन जुनी पेन्शन लागू केली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. अन्यथा राज्यातील 17 लाख कर्मचारी आंदोलनाची तीव्रता वाढविणार आहेत. म्हणूनच मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज अहमदनगर शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
जुन्या पेन्शनसाठी अनेक आंदोलनं झाली आहेत. तरीही राज्य सरकार दखल घेत नाही. म्हणूनच राज्यातील सर्व शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी आणि शिक्षक संघटनांनी बेमुदत संपावरही जाण्याचा निर्णय घेतला आहे. पेन्शन सामाजिक सुरक्षा म्हणून तो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे, त्या हक्कासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहेत, अशी माहिती कास्ट्राईब संघटना आणि जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.